नाशिक, (प्रतिनिधी) ३० जुलै - लग्नाचे आमिष दाखवून एका २९ वर्षीय घटस्फोटीत महिलेच्या असाह्यतेचा गैरफायदा घेत वेळोवेळी बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लग्नास नकार देत मारहाण करणे आणि अश्लील फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याने पीडित महिलेने पोलिसांत धाव घेतली. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
समाधान अशोक गायकवाड (वय २९, रा. अंदरसूल, ता. येवला) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी धात्रक फाटा येथील पोलीस हौसिंग सोसायटी भागात राहणाऱ्या पीडित महिलेने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अडीच वर्षांपासून सुरू होता प्रकार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ मध्ये संशयित समाधान गायकवाड आणि पीडित महिलेची ओळख झाली होती. या ओळखीचे रुपांतर हळूहळू प्रेमात झाले. याचाच फायदा घेत संशयिताने महिलेला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केला. हा प्रकार गेल्या अडीच वर्षांपासून सुरू होता.
अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी
नुकत्याच घडलेल्या घडामोडीत, संशयित समाधान याने लग्नाबाबत टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पीडित महिलेने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला. याचा राग आल्याने संतप्त झालेल्या संशयिताने महिलेला शिवीगाळ करत जबर मारहाण केली आणि लग्नास उघडपणे नकार दिला. एवढ्यावरच न थांबता, मोबाईलमधील दोघांचे अश्लील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी त्याने दिली.
या प्रकारामुळे प्रचंड घाबरलेल्या महिलेने शेवटी आडगाव पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ गुन्हा दाखल करत संशयितास अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगिता पाटील करत आहेत.