दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) ३० जुलै - जिल्ह्याच्या औद्योगिक अन् कृषी निर्यातीला मोठी गती देण्यासाठी निफाड येथे प्रस्तावित 'मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क' (MMLP / ड्राय पोर्ट) विकसित करण्याबाबत महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जेएनपीटी (JNPT) चे उपाध्यक्ष रविश कुमार सिंह यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या महाप्रकल्पाच्या रचनेवर सविस्तर चर्चा झाली. हा प्रकल्प केवळ आयात-निर्यात (EXIM) मालवाहतुकीसाठीच नव्हे, तर एकात्मिक देशांतर्गत लॉजिस्टिक्स पार्क म्हणून विकसित केला जाणार आहे.
कनेक्टिव्हिटीचा महासंगम!
प्रस्तावित निफाड ड्राय पोर्टला नाशिक-चेन्नई महामार्ग, नाशिक रिंगरोड, समृद्धी महामार्ग, ओझर विमानतळ आणि भारतीय रेल्वेचे जाळे थेट जोडले जाणार आहे. या 'मल्टी-मॉडेल कनेक्टिव्हिटी' मुळे नाशिकमधील मालवाहतूक, साठवणूक आणि वितरण व्यवस्था अधिक वेगवान व सक्षम होणार असून, जिल्ह्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय लॉजिस्टिक्स नकाशावर मानाचे स्थान मिळणार आहे.
बळीराजा आणि व्यापाऱ्यांना मोठा दिलासा
कृषी निर्यातीला चालना देण्यासाठी लासलगाव आणि पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समित्या थेट या ड्राय पोर्टशी जोडण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी मांडला आहे. पुढील टप्प्यात जिल्ह्यातील इतर बाजार समित्याही जोडल्या जातील.
तसेच, केंद्र सरकारच्या जगातील सर्वात मोठ्या *'धान्य साठवण योजने'*चे एकत्रीकरण निफाड ड्राय पोर्टशी करण्याची महत्त्वाची सूचना करण्यात आली आहे. यामुळे शेतमालाच्या साठवणुकीची समस्या सुटून अन्नधान्य पुरवठा साखळी बळकट होईल.
JNPT आणि जिल्हा प्रशासन एकत्र!
उपाध्यक्ष रविश कुमार सिंह यांनी सांगितले की, जिल्ह्यातील निर्यात प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नाशिकच्या आर्थिक विकास चमूला (Economic Development Team) जेएनपीटीच्या मुख्य वाहतूक कार्यालयाशी जोडण्यात आले आहे. तसेच आगामी ४ ऑगस्ट २०२६ रोजी होणाऱ्या 'जिल्हा निर्यात प्रोत्साहन' बैठकीत जेएनपीटी प्रमुख भागधारक म्हणून सहभागी होणार आहे.
"बहु-पद्धती कनेक्टिव्हिटी आणि जेएनपीटीच्या सहकार्यामुळे निफाड येथील हे मल्टी-मॉडेल लॉजिस्टिक्स पार्क नाशिकच्या भविष्यातील आर्थिक विकासाचे प्रमुख केंद्र ठरेल."
— आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी, नाशिक)