सिंहस्थ कुंभमेळा... नाशिकच्या प्रत्येक कॉलेजमध्ये होणार...

Share:
Main Image
Last updated: 30-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) ३० जुलै - आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या भव्य आणि यशस्वी आयोजनात युवा शक्तीचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था आणि महाविद्यालयांमध्ये स्वतंत्र 'कुंभ कक्ष' स्थापन करण्यात येणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी 'कुंभदूत' या स्वयंसेवक उपक्रमाची ऑनलाइन नोंदणी सुरू करण्यात आली असून, इच्छुकांना QR कोड स्कॅन करून नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींसोबत ऑनलाइन आढावा बैठक पार पडली. या बैठकीत सक्षम स्वयंसेवक यंत्रणा उभारणे, प्रशिक्षण आणि समन्वयावर सविस्तर चर्चा झाली.

महाविद्यालयांमधील 'कुंभ कक्ष' ठरणार समन्वयाचा दुवा

प्रत्येक शैक्षणिक संस्थेत स्थापन होणारा 'कुंभ कक्ष' हा कुंभमेळा प्राधिकरण आणि विद्यार्थ्यांमधील प्रमुख दुवा म्हणून काम करेल. या कक्षाद्वारे विद्यार्थ्यांची नोंदणी, घाट, मंदिरे, रेल्वे स्थानके, आरोग्य केंद्रे, पार्किंग आणि मदत शिबिरांमध्ये नियुक्ती केली जाईल. तसेच, राष्ट्रीय सेवा योजना (NSS), एनसीसी (NCC) आणि इतर विद्यार्थी संघटनांसोबत समन्वय साधून हा कक्ष कार्यरत राहील.

QR कोड स्कॅन करून 'कुंभदूत' म्हणून नोंदणीचे आवाहन

'कुंभदूत' उपक्रमात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रसिद्ध करण्यात आलेला QR कोड स्कॅन करून आपली वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरायची आहे. नोंदणीनंतर प्राधिकरणाकडून पुढील प्रशिक्षण व नियोजनाची प्रक्रिया राबवली जाईल. या कामासाठी प्रत्येक शैक्षणिक संस्थेने तातडीने एका नोडल अधिकाऱ्याची नियुक्ती करून त्यांची माहिती प्राधिकरणाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

"नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या यशस्वी आयोजनात विद्यार्थी स्वयंसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. 'कुंभ कक्ष'मुळे स्वयंसेवकांचे नियोजन, प्रशिक्षण आणि समन्वय अधिक प्रभावीपणे करता येईल."

— शेखर सिंह, आयुक्त, कुंभमेळा प्राधिकरण

Advertisement

'कुंभ कक्ष'ची प्रमुख कार्ये:

• विद्यार्थी स्वयंसेवकांची नोंदणी व संघटन

• 'स्वच्छ कुंभ' व 'हरित कुंभ' अभियान राबवणे

• भाविकांसाठी माहिती व मदत केंद्र चालवणे

• गर्दी व रांग व्यवस्थापनात प्रशासनाला सहकार्य

• प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक उपक्रम

• स्वयंसेवकांचे विशेष प्रशिक्षण व नियुक्ती

• डिजिटल स्वयंसेवा व सोशल मीडियाद्वारे जनजागृती

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.