अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाड... घरात घुसून विवाहितेचा विनयभंग...

Share:
Main Image
Last updated: 29-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ जुलै - शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून विनयभंग केल्याची घटना पंचवटीत, तर जयभवानी रोड परिसरात घरात घुसून विवाहितेचा विनयभंग करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अनुक्रमे पंचवटी आणि उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले असून, पंचवटी पोलिसांनी एका संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.

घटना १: अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून छेडछाड; संशयिताला बेड्या

पंचवटीतील १४ वर्षीय मुलगी मंगळवारी (२८ जुलै) सायंकाळच्या सुमारास मेरी कम्पाऊंड गेट भागातील क्वार्टरच्या दिशेने पायी जात होती. त्यावेळी अ‍ॅक्टिव्हा दुचाकीवरून आलेल्या वैभव कैलासराव गारे (वय ४२, रा. मुंदडा मार्केट, एम. जी. रोड) याने तिची वाट अडवून मोबाईल नंबर मागितला.

Advertisement

घाबरलेल्या मुलीने तेथून पडून जाण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने तिचा पाठलाग करत अश्लील चाळे केले. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा (पोक्सो - POCSO) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित वैभव गारे याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

घटना २: जयभवानी रोड भागात घरात घुसून विवाहितेचा विनयभंग

दुसरी घटना उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयभवानी रोड परिसरातील भालेराव मळा येथे घडली. पीडित विवाहिता मंगळवारी रात्री आपल्या घरात स्वयंपाक करत असताना, अनिलसिंग कपुरसिंग छपडीवाल याने बेकायदेशीरपणे घरात प्रवेश केला.

"तुझा नवरा कुठे गेला, बोलव त्याला!" असे म्हणत संशयिताने सोमवारी झालेल्या जुन्या वादाची कुरापत काढून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. पीडितेने त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता, संशयिताने तिच्या अंगावर धावून जात तिचा विनयभंग केला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार झाडे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.