नाशिक, (प्रतिनिधी) २९ जुलै - परदेशात वैद्यकीय व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना रशियन करन्सी एक्सचेंज (चलन आदलाबदल) करून देण्याच्या बहाण्याने तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. चेपॉक्सरी युनिव्हर्सिटीचे प्राधिकृत असल्याचे बनावट पत्र दाखवून या भामट्याने तब्बल १७ हून अधिक विद्यार्थ्यांची फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या एका विद्यार्थ्याने रशियाहून मायदेशी परतत इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मुख्य संशयिताला बेड्या ठोकल्या आहेत.
शुभम राकेश सिंग (रा. कमल रो-हाऊस, ज्ञानेश्वरनगर, पाथर्डी फाटा, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित ठकबाजाचे नाव आहे.
असा उघडकीस आला फसवणुकीचा आंतरराष्ट्रीय बनाव
याबाबत पृथ्वीराज पदमसिंह चाडे (वय २३, रा. चाडेगाव, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) या रशियात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा फसवणुकीचा प्रकार संशयिताच्या इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक भागातील कार्यालयात घडला.
विश्वास संपादन: सन २०२३ मध्ये पृथ्वीराज चाडे याने आपल्या वडिलांसह संशयित शुभम सिंगची भेट घेतली होती. शुभमने रशियातील 'चेपॉक्सरी युनिव्हर्सिटी'चे बनावट प्राधिकृत पत्र दाखवून बाप-लेकाचा विश्वास संपादन केला आणि सुरुवातीला काही भारतीय रुपयांचे रशियन करन्सीमध्ये (रुबल) खरेच रूपांतर करून दिले.
मित्रांनाही जाळ्यात ओढले: रशियात गेल्यावर चाडे याने तेथील मित्रांशी चर्चा केली. चलन बदलून मिळण्याची खात्री पटल्याने नोव्हेंबर २०२५ मध्ये चाडे मायदेशी परतला असता, त्याच्या ८ मित्रांनी लाखो रुपये एक्सचेंजसाठी त्याच्याकडे दिले. या भेटीत चाडे याने स्वतःचे ₹७ लाख आणि मित्रांचे ₹५३ लाख असा एकूण ₹६० लाखांचा ऐवज शुभमकडे सुपूर्द केला.
करोडोंचा गंडा: यानंतर चाडे याच्या सांगण्यावरून रशियाहून परतलेल्या अन्य ८ विद्यार्थ्यांनीही संशयित शुभम सिंगची भेट घेऊन ₹२ कोटी ८८ लाख रुपये त्याच्या स्वाधिन केले.
पैसे देऊनही करन्सी मिळेना; अखेर पोलिसात धाव
अशा प्रकारे रशियात शिकणाऱ्या एकूण १७ विद्यार्थ्यांनी तब्बल ३ कोटी ४८ लाख रुपयांचे भारतीय चलन संशयिताला दिले होते. मात्र, गेल्या ६ ते ७ महिन्यांपासून सातत्याने पाठपुरावा करूनही एकाही विद्यार्थ्याला रशियन करन्सी मिळाली नाही.
पैसे अडकल्याने रशियातील विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत असल्याने, पृथ्वीराज चाडे याने परीक्षा संपताच नाशिक गाठून थेट पोलिसांत तक्रार नोंदवली. या तक्रारीवरून इंदिरानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत संशयित शुभम सिंगला अटक केली आहे. या आंतरराष्ट्रीय आर्थिक फसवणुकीचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक फुंदे करत आहेत.