नाशिक, (प्रतिनिधी) २९ जुलै - घरकाम करणाऱ्या एका तरुणीने घरमालकाचा विश्वासघात करत कपाटातील २० हजार रुपयांची रोकड आणि साडेचौदा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची धक्कादायक घटना उंटवाडीतील संभाजी चौक परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत संशयित तरुणीला अटक केली आहे.
दर्शना गंगाराम गांगड (वय २०, रा. खालचे चुंचाळे, अंबड) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणीचे नाव आहे.
नक्की काय घडले?
या प्रकरणी नमीता शैलेश राजहंस (रा. काठियावाड शो-रूमसमोर, संभाजी चौक, उंटवाडी) यांनी मुंबईनाका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राजहंस यांच्या बंगल्यात संशयित दर्शना गांगड ही गेल्या काही वर्षांपासून घरकाम करत होती. दीर्घकाळ काम करत असल्याने ती राजहंस कुटुंबाची अत्यंत विश्वासू बनली होती.
सोमवारी (२७ जुलै) घरातील सर्व मंडळी आपापल्या कामात व्यस्त असल्याची संधी साधून, दर्शनाने बेडरूममधील कपाटात ठेवलेली २० हजार रुपयांची रोकड आणि १४ लाख ५० हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने हातोहात लांबवले.
प्रकार उघडकीस येताच पोलिसात धाव
कपाटातील रोकड आणि मौल्यवान ऐवज गायब असल्याचे निदर्शनास येताच राजहंस कुटुंबीयांनी तात्काळ मुंबईनाका पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित दर्शना गांगड हिला ताब्यात घेऊन अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनार करत आहेत.