नाशिक, (प्रतिनिधी) २९ जुलै - सातपूर औद्योगिक वसाहतीतील 'जनीत मेटा लॅण्ड प्रा.लि.' या कारखान्यात चेष्टा-मस्करीच्या नादात एका कामगाराच्या गुदद्वारात एअर कॉम्प्रेसरचा पाईप लावून हवा भरल्याचा अत्यंत धक्कादायक आणि अमानुष प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत कामगार गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू आहेत. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कंपन्यांमधील सुरक्षितता आणि कामगारांच्या छळाचा प्रश्न गंभीर बनला आहे.
या प्रकरणी अजयसिंग, तसेच कंपनीचे सुपरवायझर भाऊसाहेब सुरसे आणि विष्णू बोढरे अशा तीन संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
असा घडला भीषण प्रकार
कन्नड (जि. छत्रपती संभाजीनगर) येथील रहिवासी असलेल्या जखमी कामगाराच्या आईने या प्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवली आहे. त्यांचा मुलगा सातपूर येथील जनीत मेटा लॅण्ड कारखान्यात काम करतो. गेल्या ३ जून रोजी सकाळी तो आपले सहकाऱ्यांसोबत नेहमीप्रमाणे टेबलावर बसून काम करत होता.
त्यावेळी अजयसिंग नामक कामगार तेथे आला व चेष्टा-मस्करी करत त्याने या कामगाराला टेबलावर ढकलून दिले. तो खाली लोळत असतानाच, संशयित अजयसिंगने जवळच असलेला एअर कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाईप उचलून त्याच्या गुदद्वारास लावला आणि हवा सोडली. कॉम्प्रेसरच्या प्रचंड दाबामुळे कामगाराचे गुदद्वार फाटून मोठी दुखापत झाली.
कंपनीचे नाव न घेण्याची धमकी
हवा भरल्याने कामगाराची प्रकृती अत्यंत चिंताजनक झाली असून, त्याच्यावर गेल्या महिनाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जीवास धोका निर्माण होऊ शकतो याची कल्पना असूनही संशयिताने हे कृत्य केले.
इतकेच नव्हे, तर घटना घडल्यानंतर कंपनीचे सुपरवायझर भाऊसाहेब सुरसे आणि विष्णू बोढरे यांनी पोलिसांत कंपनीचे नाव न घेण्याची ताकीद दिली, तसेच 'नाव घेतल्यास तुझा बेत पाहू' अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत संशयितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न (Attempt to Culpable Homicide) केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करत आहेत.