नाशिक, (प्रतिनिधी) २९ जुलै - राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून जिल्हा खनिज प्रतिष्ठान योजने अंतर्गत येवला मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी १ कोटी २५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजने अंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या या विकासकामांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असून, डिजिटल शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे. या मंजूर झालेल्या कामांमध्ये येवला तालुक्यातील नगरसूल, राजापूर आणि गुजरखेडे तसेच निफाड तालुक्यातील लासलगाव, विंचूर आणि खडक माळेगाव या गावांचा समावेश आहे.
या अंतर्गत नगरसूल, राजापूर, गुजरखेडे, लासलगाव उर्दू स्कूल आणि विंचूर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये स्मार्ट क्लासरूम, आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्लासरूम, कोडिंग लॅब आणि रोबोटिक्स लॅब उभारण्यासाठी प्रत्येकी २० लाख, तर खडक माळेगाव येथे मुलींसाठी डिजिटल अभ्यासिका उभारण्यासाठी २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण मिळावे, तसेच पायाभूत सुविधांचा दर्जा उंचावावा यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. या माध्यमातून या विकासकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
या कामांमुळे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि कोडिंगसारख्या अत्याधुनिक विषयांचे शिक्षण स्थानिक पातळीवर उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मोठी मदत होणार आहे. ही मंजूर झालेली सर्व कामे तातडीने सुरू करण्यात येणार असून, वेळेत व दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या आहेत.