४८ हजारांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकासह तिघे जाळ्यात...

Share:
Main Image
Last updated: 29-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २९ जुलै - इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतमधील विकासकामांचे बिल मंजूर करून देण्यासाठी ५ टक्के दराने ४८ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या ग्रामसेवकासह सरपंचपती आणि लाच स्वीकारणाऱ्या एका खासगी इसमाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) रंगेहात पकडले. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  

ग्रामसेवक बाळू अंतू मांगटे (वय ४५, रा. घोटी), खाजगी इसम शांताराम सोनू पागीर (वय ३८, रा. धारगाव) आणि सरपंचपती पांडुरंग देवराम पुंजारा (वय २३, रा. धारगाव) अशी आरोपींची नावे आहेत.  

काय आहे प्रकरण?

तक्रारदार हे शासकीय ठेकेदार असून त्यांना धारगाव ग्रामपंचायतीत ई-निविदा पद्धतीद्वारे नळपुरवठा योजना, सार्वजनिक शौचालय आणि भूमिगत गटारांची १३ लाख ७० हजार रुपयांची एकूण ६ कामे मिळाली होती. त्यांनी सर्व कामे मुदतीत पूर्ण केली. यापैकी ९ लाख ७० हजार ८३३ रुपयांचे बिल त्यांना प्राप्त झाले होते. उर्वरित बिल काढण्यासाठी व आधी दिलेल्या बिलाच्या मोबदल्यात ग्रामसेवक बाळू मांगटे याने ५ टक्के दराने ४८ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. पैसे न दिल्यास उर्वरित बिल न काढण्याची धमकीही दिली.  

Advertisement

५ टक्क्यांच्या टक्केवारीचा खेळ उघड

तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी १३ जुलै २०२६ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक येथे तक्रार नोंदवली. त्याच दिवशी पंचांसमक्ष केलेल्या पडताळणीत ग्रामसेवकाने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.  

त्यानंतर २८ जुलै रोजी पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान ग्रामसेवक मांगटे याच्या सांगण्यावरून सरपंचपती पांडुरंग पुंजारा यानेही तक्रारदाराकडे ५ टक्के लाच देण्यास प्रोत्साहन देत मागणी केली. शेवटी ग्रामसेवक मांगटे याच्यासाठी खाजगी इसम शांताराम पागीर याने ४८ हजार रुपयांची लाच पंचांसमक्ष स्वीकारली. लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहात पकडले.  

कारवाई करणारे पथक

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अजय सूर्यवंशी, योगेश शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक पंकज पलशीकर आणि प्रमोद चव्हाणके यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.