नाशिक, (प्रतिनिधी) २९ जुलै - शहर आणि परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. त्र्यंबकरोडवर किरकोळ वादातून तीन जणांच्या टोळक्याने एका कारचा पाठलाग करत दांपत्याला धक्काबुक्की केली आणि महिलेचा विनयभंग केला. तर दुसऱ्या घटनेत पाथर्डी शिवारात 'खुन्नसने का पाहतो' असा जाब विचारत एका १९ वर्षीय तरुणावर धारदार चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या दोन्ही घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहिणे येथून परतणाऱ्या दांपत्यावर हल्ला; महिलेचा विनयभंग
पहिली घटना त्र्यंबकरोडवरील पिंपळगाव बहुला परिसरात घडली. तक्रारदार रविवारी (दि. २६) आपल्या पत्नी आणि भाचीसह निसर्गरम्य पहिणे परिसरात फेरफटका मारण्यासाठी गेले होते. सायंकाळी कुटुंबासह कारने परतत असताना, बेळगाव ढगा परिसरात संशयित रामा मांडे आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांनी त्यांची कार अडवली.
हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलावर बसण्यावरून झालेल्या जुन्या वादाची कुरापत काढून संशयितांनी दांपत्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तक्रारदाराने कारमधून खाली उतरून समजूत काढण्याचा प्रयत्न केला असता, संशयितांनी त्यांना धक्काबुक्की केली. यावेळी मदतीला धावून आलेल्या तक्रारदाराच्या पत्नीचा संशयितांनी विनयभंग केला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हवालदार बनकर अधिक तपास करत आहेत.
'खुन्नसने का पाहतो' म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
दुसरी धक्कादायक घटना पाथर्डी शिवारातील दामोदर नगर परिसरात घडली. गजानन जयसिंग सानप (वय १९, रा. दामोदरनगर, पाथर्डी फाटा) हा तरुण सोमवारी (दि. २७) सायंकाळी आपल्या घराजवळील गार्डनसमोरून दुचाकीवरून जात होता. त्यावेळी संशयित कृष्णा दंडगव्हाळ, कल्पेश पाटील आणि कौस्तुभ माने या तिघांनी त्याची वाट अडवली.
"तू माझ्याकडे खुन्नसने का बघतोस?" असा जाब विचारत कृष्णा दंडगव्हाळ याने गजाननला शिवीगाळ व दमबाजी केली. गजाननने समजून सांगण्याचा प्रयत्न केला असता, संतप्त संशयिताने कमरेचा धारदार चाकू काढून त्याच्यावर सपासप वार केले. या प्राणघातक हल्ल्यात गजाननच्या डोक्यावर आणि पाठीवर गंभीर दुखापत झाली आहे. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयितांविरुद्ध जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा (३०७) गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक शिरसाठ तपास करत आहेत.