नाशिक, (प्रतिनिधी) २८ जुलै - गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी आणि अटक टाळण्यासाठी तक्रारदाराकडे तब्बल चार लाख रुपयांच्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती अडीच लाख रुपये स्वीकारण्यास संमती दर्शवणाऱ्या तत्कालीन पोलीस उपनिरीक्षकासह (PSI) दोन खाजगी मध्यस्थांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) गुन्हा दाखल केला आहे.
हर्षवर्धन दिलीप बहीर (तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक, येवला तालुका पोलीस ठाणे, सध्या नेमणूक- श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे, जि. अहिल्यानगर), सुनील शिवाजी बोराडे (वय ३४, रा. पाटोदा, ता. येवला) आणि जगदीश तुकाराम बोराडे (वय ३७, रा. पाटोदा, ता. येवला) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
फोन पे द्वारे ५० हजार आधीच उकळले
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या भावाविरुद्ध येवला तालुका पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात भावाला आरोपी न करण्यासाठी व अटक न करण्याच्या मोबदल्यात पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहीर यांच्या सांगण्यावरून खाजगी इसम सुनील बोराडे याने तक्रारदाराकडे सुरुवातीला ४ लाख रुपयांची लाच मागितली होती. ९ एप्रिल २०२६ रोजी बोराडे याने पीएसआय बहीर यांच्याशी भेट घडवून देण्यासाठी तक्रारदाराकडून 'फोन पे'द्वारे (PhonePe) ५० हजार रुपये स्वीकारले होते.
अडीच लाखांवर तडजोड; 'एसीबी'त तक्रार
त्यानंतर उर्वरित रक्कमेसाठी तडजोड होऊन २ लाख ५० हजार रुपये लाच घेण्याचे निश्चित करण्यात आले. या प्रकरणात दुसरा खाजगी इसम जगदीश बोराडे यानेही तक्रारदाराला लाचेची रक्कम देण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार नोंदवली होती.
पडताळणीनंतर येवला पोलिसांत गुन्हा दाखल
'एसीबी'च्या तत्कालीन पोलीस निरीक्षक पूनम केदार यांनी या प्रकरणाची पडताळणी केली असता, पीएसआय बहीर यांच्या वतीने मध्यस्थांनी लाच मागितल्याचे आणि ५० हजार रुपये स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. या पडताळणीच्या आधारे २७ जुलै २०२६ रोजी येवला तालुका पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
ही कारवाई 'एसीबी'चे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे व कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश शिंदे, राहुल कुमार नाईक व त्यांच्या पथकाने केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल कुमार नाईक करत आहेत.