दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २८ जुलै - ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा (कॉमनवेल्थ) स्पर्धेत नाशिकच्या निफाड तालुक्यातील सुपुत्र सर्वेश अनिल कुशारे याने इतिहास रचला आहे. पुरुषांच्या उंच उडी (High Jump) प्रकारात २.२५ मीटर उंच उडी मारत सर्वेशने भारतासाठी ऐतिहासिक रौप्य पदकाची कमाई केली. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या इतिहासात उंच उडी या प्रकारात रौप्य पदक जिंकणारा सर्वेश हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरला आहे.
अशी रंगली सुवर्णपदकाची थरारक शर्यत
सर्वेश कुशारे आणि जमैकाचा रोमेन बेकफर्ड यांच्यात अंतिम टप्प्यापर्यंत सुवर्णपदकासाठी जोरदार चुरस पाहायला मिळाली. दोघांनाही २.२८ मीटर उंचीचे आव्हान पूर्ण करता आले नाही. दोन्ही खेळाडूंनी २.२८ मीटरसाठी केलेले तिन्ही प्रयत्न अपयशी ठरले. मात्र, काऊंटबॅक (Countback) च्या नियमानुसार, रोमेन बेकफर्डने २.२५ मीटरची उडी पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पूर्ण केल्याने त्याला सुवर्णपदक जाहीर झाले. तर सर्वेश कुशारेला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत इंग्लंडच्या किमानी जॅकने २.२० मीटर उडी मारून कांस्य पदक पटकावले.
याआधी बर्मिंगहॅम (२०२२) राष्ट्रकुल स्पर्धेत तेजस्वीन शंकरने २.२२ मीटर उडी मारत कांस्य पदक जिंकले होते. आता सर्वेशने रौप्य पदकाला गवसणी घालत भारतीय ॲथलेटिक्समध्ये नवे दालन उघडले आहे.
मक्याच्या भुशावर सराव अन् अथांग जिद्द!
सर्वेशच्या या ऐतिहासिक यशामागे त्याची प्रचंड जिद्द आणि खडतर प्रवास दडला आहे. निफाड तालुक्यातील देवगाव येथील 'श्री. डी. आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया'चा तो माजी विद्यार्थी आहे. सर्वेशचे वडील अनिल कुशारे हे शेतकरी असून मुलाने सिव्हिल इंजिनिअर व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, सर्वेशचे मन उंच उडीत रमले.
नाशिक विभागीय शालेय क्रीडा स्पर्धेत सर्वेशने तृतीय क्रमांक मिळवल्यानंतर क्रीडा प्रशिक्षक रावसाहेब जाधव यांनी २०१० पासून त्याच्यातील प्रतिभा ओळखून विशेष मार्गदर्शन सुरू केले. गावात पुरेशा सुविधा नसल्याने मक्याचा भुसा, जुने कपडे आणि कापूस एकत्र करून एक 'गावठी गादी' तयार करण्यात आली. याच साध्या गादीवर सराव करत सर्वेशच्या या सुवर्णमयी भविष्याची पायाभरणी झाली.
सैन्यातील प्रवेश ते राष्ट्रीय विक्रमाचा टप्पा
२०१६ मध्ये भारतीय सैन्यात (Indian Army) दाखल झाल्यानंतर पुण्यातील 'आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट'मध्ये त्याला आधुनिक प्रशिक्षण मिळाले. त्यानंतर दक्षिण आशियाई स्पर्धेत सुवर्ण, आशियाई ॲथलेटिक्समध्ये रौप्य, जागतिक स्पर्धेत सहभाग आणि पॅरिस ऑलिम्पिकची पात्रता असा त्याचा प्रवास राहिला.
गेल्या वर्षी टोकियो येथील जागतिक स्पर्धेत २.२८ मीटरची वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करत अंतिम फेरीत ६ वे स्थान मिळवणारा तो पहिला भारतीय ठरला होता. तर यंदा भुवनेश्वर येथील राष्ट्रीय आंतरराज्य स्पर्धेत तब्बल २.३१ मीटर उंच उडी मारत त्याने तेजस्वीन शंकरचा राष्ट्रीय विक्रम (National Record) मोडीत काढला होता.
सर्वेशच्या या अभूतपूर्व कामगिरीमुळे निफाडसह संपूर्ण नाशिक जिल्ह्यात आणि क्रीडा जगतात आनंदाचे वातावरण असून सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.