नाशिक, (प्रतिनिधी) २८ जुलै - दिव्यांग व विशेष गरजा असणाऱ्या मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना देण्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि विरंगुळ्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या, उत्तर महाराष्ट्रातील पहिल्या सर्वसमावेशक 'सहांगण' थेरॅप्युटिक पार्कचे आज आनंदवल्ली, गंगापूर रोड येथील सिरीन मेडोज परिसरात भव्य उद्घाटन पार पडले.
हा अनोखा प्रकल्प 'हौसला बहुउद्देशीय संस्था' यांची संकल्पना व अंमलबजावणी, नाशिक महानगरपालिकेचे सहकार्य, 'रोथे एड्रे इंडिया प्रा. लि.' यांचा सीएसआर (CSR) निधी आणि 'एस. एम. ॲक्टिव्ह फ्रेंड्स सर्कल' या स्थानिक रहिवाशांच्या पाठिंब्यातून साकार झाला आहे.
प्रमुख मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन शिलाफलक अनावरण
या सोहळ्यात नाशिकच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे, नाशिक मनपा आयुक्त मनीषा खत्री, पोलीस उपायुक्त किशोर काळे आणि 'हौसला' एनजीओचे संस्थापक तेजस चव्हाण यांच्या शुभहस्ते शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले.
या वेळी मनपा उद्यान अधीक्षक विवेक भदाणे, नगरसेविका उषा बेंडकोळी, अंकिता शिंदे, प्रविण पाटील तसेच रोथे एड्रे इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व सीईओ मनिष अग्रवाल, संचालक सर्वेश वर्मा, गंभीर गुप्ता, विनय सावंत, उन्मेष कुलकर्णी आणि सिरीन मेडोज रहिवाशी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
या प्रसंगी प्रबोधिनी ट्रस्ट, श्री सिद्धिविनायक दिव्यांग पुनर्वसन संस्था, व्ही-ॲक्सल लर्निंग सेंटर आणि श्रीमती माई लेले श्रवण विकास विद्यालयाची विशेष मुले व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी लोकनार यांनी केले. या प्रकल्पासाठी प्रसाद गर्भे, प्रमोद वाटकर व अनिल रावते यांनी विशेष मेहनत घेतली.
'सहांगण' पार्कची वैशिष्ट्ये व संकल्पना
प्रेसिडेंट / कन्सेप्ट नोट:
'सहांगण' म्हणजे एकत्र खेळण्याचे आणि आनंद घेण्याचे हक्काचे अंगण! निसर्गाच्या माध्यमातून आरोग्य, उपचार, शिक्षण आणि खेळाचा संगम घडवणारे हे उत्तर महाराष्ट्रातील पहिलेच पार्क आहे.
पंचज्ञानेंद्रियांना उद्दीपन: मानवाच्या पाचही ज्ञानेंद्रियांना (दृष्टी, गंध, स्पर्श, शब्द व स्वाद) उद्दीपित करणारी रचना विशेष मुलांच्या क्षमतांचा विकास करण्यास मदत करते.
सेन्सरी थेरॅपी व खेळणी: सेन्सरी गार्डन्स, व्हीलचेअर-सुलभ रॅम्प्स, टॅक्टाइल पेव्हिंग (स्पर्शज्ञान मार्ग), सर्वसमावेशक खेळणी आणि स्पष्ट माहिती फलक बसवण्यात आले आहेत.
सर्वसमावेशक रचना: दिव्यांग मुले आणि सामान्य मुले एकत्र खेळू शकतील अशी सुरक्षित व सुलभ व्यवस्था.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा: ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी सुसज्ज बसण्याची व्यवस्था, निसर्गरम्य वातावरण आणि वॉकिंग ट्रॅक उपलब्ध