मनोहर शिंदे, (नाशिक) २७ जुलै - त्र्यंबकेश्वरच्या तळेगाव शिवारातील स्वामी समर्थ केंद्रानजीक शस्त्रांचा धाक दाखवून ११.९९ लाख रुपयांचा मुद्देमाल लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीचा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत पर्दाफाश केला आहे. 'डायल ११२' प्रणालीवर आलेल्या कॉलचा तातडीने पाठपुरावा करत त्र्यंबकेश्वर पोलिसांनी सापळा रचून या दरोड्यातील ११ संशयित आरोपींना अटक केली आहे.
घडलेला प्रकार:
२६ जुलै २०२६ रोजी पहाटे ३:०० वाजेच्या सुमारास तळेगाव (अंजनेरी परिसर) शिवारात १० ते १२ अज्ञात आरोपी तोंडाला रुमाल बांधून आले. त्यांनी साईट सुपरवायझर ज्ञानेश्वर सुळे व त्यांच्या साथीदाराला तलवार, कुऱ्हाड, लोखंडी रॉड, कटर आणि कोयता अशा प्राणघातक शस्त्रांचा धाक दाखवून पळवून नेले. तेथे जबरदस्तीने मोबाईल फोन, साईटवरील ट्रॅक्टर आणि सबस्टेशनसाठी वापरण्यात येणाऱ्या SQMM कंडक्टर वायरचे दोन ड्रम असा एकूण ₹११,९९,०५० चा मुद्देमाल दरोडा टाकून चोरून नेला.
'डायल ११२' अन् पोलिसांचा थरारक पाठलाग
घटना घडल्यानंतर फिर्यादीने तात्काळ 'डायल ११२' वर संपर्क साधला. माहिती मिळताच त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक, दुय्यम अधिकारी व गस्तीवरील अंमलदारांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. सरकारी वाहनाने आरोपींचा पाठलाग करत नाकाबंदी व अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचून अवघ्या काही वेळात ११ जणांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेले आरोपी:
१. मनिष मदन सिंग (वय २१, रा. एक्सलो पॉईंट, नाशिक)
२. रोशन खंडु पाटील (वय ३०, रा. वाडीव्ह-हे, इगतपुरी)
३. योगेश कुमार सिताराम कुमार (वय ३४, रा. अंबड, नाशिक)
४. गणेश कैलास कातोरे (वय १९, रा. वांजीरगल्ली, वाडीव्ह-हे)
५. अथर्व संजय सारुकते (वय १९, रा. माळुंजकर गल्ली, वाडीव्ह-हे)
६. समाधान शिवाजी माळुंजकर (वय १८, रा. माळुंजकर गल्ली, वाडीव्ह-हे)
७. पियुष अंबादास गवते (वय १८, रा. वाडीव्ह-हे, इगतपुरी)
८. कुणाल शरद चोथे (वय १९, रा. वंजारगल्ली, वाडीव्ह-हे)
९. शेखर जिवन असवले (वय १८, रा. वाडीव्ह-हे, इगतपुरी)
१०. अजय जिवन चोथे (वय १९, रा. वंजारगल्ली, वाडीव्ह-हे)
११. मनोज शांताराम मुर्तडक (वय २०, रा. वंजारगल्ली, वाडीव्ह-हे)
₹६.८० लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींविरुद्ध त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. १२५/२०२६ (भा.न्या.सं. कलम ३१०(२), १४०(३)) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून दरोड्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर, SQMM कंडक्टर वायर, ०५ मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली हत्यारे (लोखंडी कैचीचे कटर, कुऱ्हाड, तलवार, कोयता, पकड, स्क्रू ड्रायव्हर) असा एकूण ₹६,८०,००० चा मुद्देमाल हस्तगत केला आहे. उर्वरित मुद्देमाल व इतर पसार आरोपींचा शोध सुरू आहे.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर पोलिसांनी ही कारवाई यशस्वी केली