नाशिक, (प्रतिनिधी) २७ जुलै - रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या अध्यक्षपदी शिल्पा पारख, सचिवपदी ऋषिकेश संम्मनवार आणि सहसचिवपदी हेमराज राजपूत यांची निवड झाली असून, त्यांचा पदग्रहण सोहळा रविवारी 'दि गेटवे हॉटेल' येथे मोठ्या उत्साहात पार पडला. रोटरी क्लब ऑफ नाशिकच्या ८१ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच नवीन कार्यकारिणीत १५ महिलांना स्थान देण्यात आले आहे.
हा शानदार पदग्रहण सोहळा विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि रोटरीचे प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या वेळी मावळते अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी अध्यक्षपदाची सूत्रे शिल्पा पारख यांच्याकडे, तर सीए रेखा पटवर्धन यांनी सचिवपदाची सूत्रे ऋषिकेश संम्मनवार यांच्याकडे सुपूर्द केली. या सोहळ्यात नवनिर्वाचित संचालकांचाही शपथविधी पार पडला.
कुंभमेळ्यात रोटरीचे सामाजिक योगदान महत्त्वाचे – डॉ. प्रवीण गेडाम
या वेळी बोलताना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम म्हणाले, "गेल्या ८१ वर्षांची उज्ज्वल परंपरा लाभलेल्या रोटरी क्लब ऑफ नाशिकचे कार्य अत्यंत कौतुकास्पद आहे. सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देणाऱ्या या संस्थेचे उपक्रम पाहून आनंद वाटतो. आगामी नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासनासोबत रोटरी संस्थेनेही आपले सामाजिक योगदान द्यावे. रोटरीच्या या उपक्रमांत शासनही पूर्ण सहकार्य करेल."
प्रांतपाल डॉ. राजेश पाटील यांनी रोटरीच्या विविध प्रकल्पांचा गौरव करत संपूर्ण राज्यात या क्लबचे कार्य अग्रगण्य असल्याचे सांगितले. या वेळी 'रोटरीनामा' या विशेष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
सांस्कृतिक कार्यक्रम व अहवाल सादरीकरण
माजी अध्यक्ष डॉ. गौरव सामनेरकर यांनी गतवर्षातील सामाजिक कार्याचा अहवाल चित्रफितीद्वारे सादर केला. कार्यक्रमाची सुरुवात विस्डम शाळेच्या मुलांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाने झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनाली चिंधडे, डॉ. नेहा मेहेर व वृषाली ब्राह्मणकर यांनी केले, तर आभार सचिव ऋषिकेश सम्मनवार यांनी मानले.
या प्रसंगी माजी प्रांतपाल नाना शेवाळे, आशा वेणूगोपाल, रमेश मेहेर, राजीव शर्मा, मनीष चंद्रा, उदयराज पटवर्धन, ओमप्रकाश रावत, मंगेश अपशंकर, अनिल सुकेनकर, विजय दिनानी, शशिकांत पारख, कमलाकर टाक, मकरंद चिंधडे, श्रिया कुलकर्णी यांच्यासह रोटरीचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.