भोंदू डॉ. मोहन पुरी एफडीएच्या कचाट्यात... सिन्नरमधील ही बेकायदेशीर औषध कंपनी बंद...

Share:
Main Image
Last updated: 27-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २७ जुलै - सिन्नर तालुक्यातील जायगाव येथील 'शिवनाथ आयुर्वेद प्रॉडक्ट' या औषध निर्मिती कंपनीचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कायमचा रद्द केला आहे. बेकायदेशीर औषध निर्मिती आणि भोंदूगिरीला खतपाणी घालणाऱ्या या प्रकरणाविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ('अंनिस') सातत्याने पाठपुरावा केला होता. एफडीएच्या या कठोर कारवाईमुळे भोंदूगिरी करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

भोंदू गडगेबाबा प्रकरणातून उघडकीस आले तपासाचे धागेदोर

संगमनेर जवळील वडगाव पान येथील बहुचर्चित भोंदू राजेंद्र गडगेबाबा याच्याविरोधात अंनिसच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात सिन्नरचा डॉ. मोहन पुरी हा सहआरोपी आहे. भोंदू गडगेबाबाच्या दरबारात हा डॉक्टर रुग्णांना आणि भक्तांना बोगस औषधे देत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत तिथे औषधांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला होता.

एफडीएच्या छाप्यात गंभीर त्रुटी उघड

ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी अन्न व औषध प्रशासनाकडे डॉ. पुरी हा नियमबाह्य व संशयास्पद पद्धतीने औषध निर्मिती करत असल्याची अधिकृत तक्रार नोंदवली होती. या तक्रारीवरून एफडीएच्या नाशिक पथकाने जायगाव येथील निर्मिती प्रकल्पावर छापा टाकून प्रत्यक्ष पाहणी केली. या तपासणीत:

औषध निर्मितीचे आवश्यक कायदेशीर निकष पाळले जात नसल्याचे आढळले.

Advertisement

उत्पादन प्रक्रियेत अत्यंत गंभीर त्रुटी आणि नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे सिद्ध झाले.

सुनावणीअंती परवाना कायमचा रद्द

तपासणीतील गंभीर त्रुटींच्या आधारे एफडीएने डॉ. पुरी यांना नोटीस बजावून स्पष्टीकरण मागवले होते. या प्रकरणी झालेल्या सुनावणीत नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे स्पष्ट झाल्याने प्रशासनाने ३० जून २०२६ रोजी अंतरिम आदेश पारित करत 'शिवनाथ आयुर्वेद'चा औषध निर्मितीचा परवाना कायमस्वरूपी रद्द केला.

नाशिक परिमंडळ-२ चे सहाय्यक आयुक्त (औषधे) व अनुज्ञप्ती अधिकारी चं. अ. मोरे यांनी या कारवाईची अधिकृत माहिती पत्राद्वारे ॲड. रंजना पगार-गवांदे यांना दिली आहे.

भोंदूबाबांचा कथित हस्तक?

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, डॉ. मोहन पुरी हा भोंदू राजेंद्र गडगेबाबाचा निकटवर्तीय आणि कथित हस्तक म्हणून काम करत होता. तो राज्यातील विविध भोंदूबाबांना अशा प्रकारचा बेकायदेशीर औषध पुरवठा करत असल्याचा संशयही तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.

या प्रसिद्धी पत्रकावर अंनिसच्या ॲड. रंजना पगार-गावंदे, डॉ. टी. आर. गोराणे, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव, आणि कृष्णा चांदगुडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.