मनोहर शिंदे, (नाशिक) २७ जुलै - आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा अधिक भव्य आणि सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने तब्बल २४,४२५.३९ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला (Development Plan) मंजुरी दिली आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री गजेन्द्र सिंह शेखावत यांनी आज (२७ जुलै २०२६) लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ही अधिकृत माहिती दिली.
मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखालील 'शीर्ष समिती'कडून मंजुरी
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार, १३ मार्च २०२६ रोजी पार पडलेल्या अव्वल समितीच्या (Apex Committee) बैठकीत मुख्यमंत्री यांच्या हस्ते या भव्य कुंभमेळा विकास आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. कुंभमेळ्याचे सुयोग्य नियोजन आणि अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने विशेष व्यवस्था उभारली आहे:
४० सदस्यीय शीर्ष समिती (Apex Committee): मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ४० सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून यात नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या खासदारांचाही समावेश करण्यात आला आहे.
नियोजन व समन्वय समित्या: धोरणात्मक निर्णयांसाठी 'कुंभमेळा मंत्री समिती' आणि प्रत्यक्ष नियोजनासाठी 'कार्यकारी समिती' गठीत करण्यात आली आहे.
विशेष कुंभमेळा प्राधिकरण: विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी, निधी व्यवस्थापन आणि आंतर-विभागीय समन्वयासाठी 'नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणा'ची स्थापना करण्यात आली आहे.
केंद्रीय पर्यटन मंत्रालयाकडे अद्याप प्रस्ताव नाही
पर्यटन मंत्रालय राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना उत्सव व जत्रांच्या प्रसिद्धीसाठी मार्गदर्शक तत्त्वांनुसार केंद्रीय आर्थिक सहाय्य (CFA) मंजूर करते. मात्र, आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव प्राप्त झालेला नाही, असेही पर्यटन मंत्र्यांनी लोकसभेत स्पष्ट केले.
दरम्यान, कुंभमेळा हा वैश्विक सोहळा असताना त्याविषय फडणवीस सरकारकडून पर्यटनाचा प्रस्ताव न जाणे यावरून आगामी काळात मोठा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.