मनोहर शिंदे, (नाशिक) २७ जुलै - शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे सचिव जितेंद्र पापळकर आणि मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनी रविवारी (२६ जुलै) सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी ते सायाळे आणि खोपडी ते मिरगाव या पुरचाऱ्यांसह देवपूर (कंभळाचे झाड) येथील कोल्हापूर पद्धतीच्या (को. प.) बंधाऱ्याच्या कामांची प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान कामांची गुणवत्ता आणि जलसंधारणामुळे परिसरात झालेल्या सकारात्मक बदलांवर सचिव श्री. पापळकर यांनी समाधान व्यक्त केले.
“पाणी शेवटच्या घटकापर्यंत जलद पोहोचण्यासाठी बंदिस्त पुरचाऱ्या प्रभावी”
पाहणीदरम्यान अधिकाऱ्यांशी संवाद साधताना सचिव जितेंद्र पापळकर म्हणाले, “बंदिस्त पुरचारी ही जलसंधारण विभागाची पहिलीच नवोन्मेषकारी योजना आहे. अशा योजनांमुळे पाण्याचा अपव्यय टळून ते शेवटच्या घटकापर्यंत अत्यंत कमी वेळेत पोहोचते.” भविष्यात या योजना लाभधारकांकडून (शेतकऱ्यांकडून) स्वयंचलित पद्धतीने हाताळल्या जाव्यात, या दृष्टीने अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी विभागाला दिले. तसेच भविष्यातही गुणवत्तापूर्ण कामे करून ग्रामीण भागातील जलसुरक्षेला अधिक बळकटी देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
मुख्य अभियंता हरिभाऊ गिते यांनीही कामाच्या गुणवत्तेबाबत समाधान व्यक्त करत, आगामी काळातील सर्व कामे अधिक दर्जात्मक व वेळेत पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
पुरचारी प्रकल्पांचे प्रमुख वैशिष्ट्य व व्याप्ती:
१. कुंदेवाडी ते सायाळे पुरचारी:
लांबी: ३६ किलोमीटर
आरक्षित पाणी: १०५ दशलक्ष घनफूट (TMC/CFT)
फायदा: २४८ हेक्टर सिंचनाला थेट लाभ; ४०० विहिरींच्या पुनर्भरणात वाढ.
लाभार्थी २-गावे (२० गावे): कुंदेवाडी, गुरेवाडी, हबेवाडी, मुसळगाव, गोंदे, दातली, खंबाळे, मऱ्हळ खुर्द, मऱ्हळ बुद्रुक, सुरेगाव, भोकणी, दोडी, मानोरी, कणकोरी, निऱ्हाळे, फुलेनगर, घोटेवाडी, कहांडळवाडी, सायाळे आणि चोरकौठे.
२. खोपडी ते मिरगाव कालवा:
लांबी: २५ किलोमीटर
आरक्षित पाणी: ११७ दशलक्ष घनफूट
फायदा: २५० हेक्टर सिंचनाला लाभ; २५० विहिरींना पुनर्भरणाचा फायदा.
लाभार्थी गावे (१३ गावे): खोपडी बु., फर्दापूर, धारणगाव, देवपूर, पंचाळे, शिंदेवाडी, पांगरी, पिंपळगाव, शहा, मिठसागरे, पिंपरवाडी, मिरगाव आणि कोळगावमाळ.
अधिकाऱ्यांची उपस्थिती
या क्षेत्रीय पाहणीप्रसंगी उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिन खंबाईत, जलसंधारण अधिकारी बाळासाहेब डोळसे, कंत्राटदार किरण पाटील यांच्यासह महसूल व जलसंधारण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. जलसंधारणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी अशा प्रत्यक्ष पाहण्या मार्गदर्शक ठरत असल्याचे उपस्थितांनी सांगितले.