नाशिक, (प्रतिनिधी) २७ जुलै - भरधाव वेगात येणाऱ्या एका इनोव्हा कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत २९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही अपघात सोमेश्वर मंदिर परिसराच्या प्रवेशद्वाराजवळ घडला. या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आकाश केशव भगत (वय २९, मूळ रा. वायचाळ पिंपरी, जि. हिंगोली; सध्या रा. ध्रुवनगर, नाशिक) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या रविवारी (१९ जुलै) आकाश भगत हे त्यांच्या स्प्लेंडर दुचाकीवरून (क्रमांक: MH 37 1881) ध्रुवनगरकडून जेहान सर्कलच्या दिशेने जात होते. सायंकाळच्या सुमारास सोमेश्वर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या एका इनोव्हा कारने (क्रमांक: MH 48 BN 3545) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
या भीषण अपघातात आकाश भगत यांच्या डोक्याला आणि शरीराला गंभीर दुखापत झाली होती. अपघातांतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
पोलीस तपास सुरू
या अपघाताप्रकरणी सुदर्शन बनसोडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार ढमाले करत आहेत.