तोंडाला रुमाल बांधून पळण्याच्या तयारीत होता... द्वारका चौकात पोलिसांनी असा धरला...

Share:
Main Image
Last updated: 26-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २६ जुलै - मालकाचा विश्वास संपादन करून दुकानातून लाखांची रोकड व मुद्देमाल चोरून गंडा घालणाऱ्या सराईत कामगाराला आडगाव पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने जाळ्यात ओढले आहे. आरोपीकडून २ लाख ६९ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, अरविंद गणेश पुरोहित (वय २४, रा. पानचौर, जि. जालोर, राजस्थान) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

नेमकी घटना काय?

म्हसरूळ-पंचवटी परिसरातील रहिवासी शेाराम चत राराम चौधरी (वय ४६) यांचे आडगाव शिवार येथील जत्रा हॉटेल चौकात 'स्वागत स्विट मार्ट' नावाचे मिठाईचे दुकान आहे.

२० जुलै रोजी रात्री १२:३० ते पहाटे १:१५ या वेळेत दुकानात काम करणारा कामगार अरविंद पुरोहित याने मालकाचा विश्वास संपादन करून दुकानातील:

२,७४,०००/- रुपये रोख रक्कम

१०,०००/- रुपये किमतीचा लिनोव्हो कंपनीचा लॅपटॉप

२०,०००/- रुपये किमतीचे चांदीचे कडे

असा एकूण ३,०४,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून पोबारा केला होता.

याप्रकरणी चौधरी यांच्या फिर्यादीवरून आडगाव पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०५, ३०६, ३१६(२), ३१४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

नाट्यमय घडामोडी अन् पोलिसांचा सापळा

गुन्ह्याचा तपास सुरू असताना आडगाव गुन्हे शोध पथकातील पोनि/श्री दिलीप राठोड यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, आरोपी अरविंद हा द्वारका येथून बसने पुणे येथे पळून जाण्याच्या तयारीत आहे.

माहिती मिळताच पथकाने त्वरित द्वारका सर्कल येथे सापळा रचला. संशयित आरोपी तोंडाला रुमाल बांधून जात असताना पोलीस अंमलदारांनी त्याच्या शरीरयष्टीवरून त्याला ओळखले. पोलिसांची चाहूल लागताच आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होता; मात्र शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले.

२ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त

आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीस गेलेला २,६९,००० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यामध्ये:

२,३९,०००/- रुपये रोख रक्कम

१०,०००/- रुपये किमतीचा लॅपटॉप

२०,०००/- रुपये किमतीचे चांदीचे कडे

पोलीस पथकाची कामगिरी

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (परि. ०१) श्रीमती मोनिका न. राऊत, व सहाय्यक पोलीस आयुक्त (पंचवटी विभाग) शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण, प्रभारी पोनि गौतम वावळे, पोनि दिलीप राठोड, सपोनि निखिल बोंडे, सपोनि सतिश जगदाळे, पोउनि भगवंत घोडे व गुन्हे शोध पथकाच्या कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई केली. पुढील तपास पोउनि घोडे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.