गॅलरीतून पडून एकाचा अंत... दुचाकी घसरून एक ठार...

Share:
Main Image
Last updated: 26-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २६ जुलै - शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या दुर्दैवी घटनांमध्ये एका ५८ वर्षीय व्यक्तीचा गॅलरीतून खाली पडून, तर एका ६८ वर्षीय वृद्धाचा भरधाव दुचाकी घसरून मृत्यू झाला. याप्रकरणी अनुक्रमे सातपूर आणि उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

१. गॅलरीतून तोल जाऊन पडल्याने ५८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

पहिली घटना सातपूर औद्योगीक वसाहतीतील श्रमिकनगर भागात घडली. येथील गंगासागरनगरमधील 'अनु आरती हाईट्स'मध्ये राहणारे सुनील पुंडलिक जाधव (वय ५८) हे शुक्रवारी (दि. २४) सकाळी राहत्या घराच्या दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीत उभे असताना अचानक त्यांचा तोल गेला. त्यामुळे ते थेट जमिनीवर कोसळले.

Advertisement

या अपघातात त्यांच्या नाका-तोंडातून प्रचंड रक्तस्राव होऊन ते जागीच बेशुद्ध झाले. त्यांचा मुलगा सचिन जाधव यांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस हवालदार बनकर पुढील तपास करत आहेत.

२. गंधर्वनगरीत भरधाव दुचाकी घसरून ६८ वर्षीय वृद्धाचा अंत

दुसरी घटना नाशिकरोड परिसरातील गंधर्वनगरी भागात घडली. नाशिकरोड येथील 'त्रिदल सोसायटी'त राहणारे प्रदीप नारायण रत्नपारखे (वय ६८) हे शुक्रवारी (दि. २४) दुपारी दुचाकीवरून गंधर्वनगरीकडून नाशिकरोडच्या दिशेने जात होते.

प्रवासादरम्यान त्यांची भरधाव दुचाकी अचानक घसरल्याने ते रस्त्यावर जोरदार आदळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर शुभांगी रत्नपारखी यांनी त्यांना तातडीने मॅग्नम हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. मात्र, तेथील डॉ. राहुल बिर्ला यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून, पोलिस जमादार जाधव तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.