नाशिकमध्ये विवाहितांच्या छळाचे सत्र... ३ वेगवेगळ्या घटनांत गुन्हे दाखल...

Share:
Main Image
Last updated: 25-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ जुलै - शहर व परिसरात सासरच्या मंडळींकडून विवाहितांचा शारीरिक व मानसिक छळ होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र समोर आले आहे. शुल्लक कारणांवरून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये विवाहितांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणी पंचवटी, गंगापूर आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यांत संशयितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

१. पंचवटी: पतीसह सासरच्यांवर गुन्हा, सासऱ्याकडून विनयभंग

पंचवटी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सन २०२३ पासून तिचा सासरच्या मंडळींकडून सतत छळ सुरू होता. कोणार्क नगर भागात राहणाऱ्या पतीसह सासू आणि सासऱ्याने तिला त्रास दिला. याशिवाय सासऱ्याने तिचा विनयभंग केल्याचा गंभीर आरोपही पीडितेने केला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार कोरडे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

२. गंगापूर: ३५ तोळे स्त्रीधन लाटले; ५ जणांवर गुन्हा

दुसरी घटना दीपाली नगर भागात घडली आहे. येथे राहणाऱ्या विवाहितेचा पतीसह सासरच्या पाच जणांनी किरकोळ कारणांवरून छळ केला. संशयितांनी पीडितेला शिवीगाळ व मारहाण करत धमकवले, तसेच तिच्या अंगावरील तब्बल ३५ तोळे वजनाचे स्त्रीधन बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस उपनिरीक्षक कवाद तपास करत आहेत.

३. नाशिकरोड: दरमहा १ लाखाच्या हप्त्यासाठी मारहाण

तिसरा प्रकार जेलरोड परिसरात घडला आहे. पीडित महिलेचा सन २०२३ पासून पती आणि अन्य तिघांकडून क्रूर छळ सुरू होता. माहेरून दरमहा १ लाख रुपये आणण्याच्या मागणीसाठी तिला सतत मारहाण व शिवीगाळ केली जात होती. तसेच संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडितेने नाशिकरोड पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस हवालदार कुऱ्हाडे तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.