नाशिक जिल्ह्याच्या या भागात भूकंपाचे सलग ४ धक्के... नागरिकांमध्ये घबराट, थेट रस्त्यावर पळाले...

Share:
Main Image
Last updated: 25-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २५ जुलै - जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात आज (२५ जुलै) सकाळी भूकंपाच्या सलग चार धक्क्यांनी नागरिक हादरले. बोरगाव परिसरासह वांझुळपाडा, हरणटेकडी, रोटी, शिंदे आणि मोहपाडा (चि) या गावांमध्ये सकाळी ९:५५ ते दुपारी १२:१० या कालावधीत हे धक्के जाणवले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्तहानी झालेली नाही, परंतु मोठ्या आवाजांसह हादरे बसल्याने ग्रामस्थांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.

महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात 'मेरी' (MERI), नाशिक या भूकंपमापन यंत्रणेकडून मिळालेल्या अधिकृत नोंदीनुसार, पहिला धक्का सकाळी ९:५५ वाजता ३.० रिश्टर स्केल तीव्रतेचा नोंदवला गेला. त्यानंतर लगेच १०:०१ वाजता (२.२ रिश्टर स्केल), १०:०२ वाजता (२.० रिश्टर स्केल) आणि दुपारी १२:१० वाजता (२.५ रिश्टर स्केल) असे सलग हादरे बसले. या भूकंपांचे केंद्र नाशिक निरीक्षणागारापासून साधारण ४५ ते ४७ किलोमीटर अंतरावर होते. सुरगाणा व्यतिरिक्त शेजारच्या दिंडोरी तालुक्यातील भनवड परिसरातही दोन सौम्य धक्के जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे.

प्रशासन सतर्क; तहसीलदारांकडून पाहणी सुरू

घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा सतर्क झाली असून तहसीलदार आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी तत्काळ बाधित गावांमध्ये प्रत्यक्ष पाहणी सुरू केली आहे. फक्त मोठे आवाज होऊन हादरे बसल्याची माहिती समोर आली आहे. तहसीलदार यांच्याकडून विस्तृत पंचनामा व पाहणी अहवाल लवकरच वरिष्ठ प्रशासनाला सादर केला जाणार आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हा प्रशासनाचे आवाहन

Advertisement

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष सद्यस्थितीवर २४ तास बारीक लक्ष ठेवून आहे. 'मेरी' नाशिक आणि तज्ज्ञांकडून परिस्थितीचे सातत्याने विश्लेषण केले जात असून, नागरिकांनी घाबरून न जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

महत्त्वाची माहिती व आपत्कालीन संपर्क:

अफवांपासून सावध राहा: सोशल मीडियावर येणाऱ्या असत्यापित माहितीवर किंवा अफवांवर विश्वास ठेवू नका व त्या प्रसारित करू नका.

मदतीसाठी संपर्क: आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ १०७७ या टोल-फ्री क्रमांकावर किंवा ०२५३-२३१४१८१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

आवश्यकता भासल्यास नागरिकांनी नजीकच्या तहसील कार्यालय अथवा ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.