नाशिक, (प्रतिनिधी) २५ जुलै - बनावट ‘शालार्थ आयडी’ तयार करून राज्य शासनाची तब्बल १९० कोटी रुपयांची महाप्रचंड आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक शहर गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार आणि तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगणीकर (वय ६६) यांना धुळे येथून अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली असून शिक्षण विभागाचा सावळागोधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
४५९ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या नावाने खोटी मान्यता
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, शशिकांत हिंगणीकर हे जळगाव जिल्हा परिषदेत माध्यमिक शिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असताना हा महाघोटाळा घडला.
कोणताही वैध प्रस्ताव नसताना आणि नियमांची पायमल्ली करून नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील ४५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट वैयक्तिक मान्यता देण्यात आल्या.
या बनावट मान्यतेच्या आधारे बोगस 'शालार्थ आयडी' (Shalarth ID) तयार करून शासनाकडून करोडो रुपयांचे वेतन आणि थकबाकीची रक्कम हडप करण्यात आली.
तब्बल १,२०० संशयित आरोपी!
या संपूर्ण घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड मोठी असून, नाशिक शहर पोलिसांनी केलेल्या सखोल तपासात आतापर्यंत सुमारे १,२०० संशयित आरोपी निष्पन्न झाले आहेत. यामध्ये अनेक शाळांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
धुळ्यातून शिताफीने अटक
नाशिकरोड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ आणि माहिती तंत्रज्ञान (IT Act) अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेचे पथक हिंगणीकर यांच्या शोधात होते. गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हिंगणीकर हे धुळ्यात असल्याची माहिती मिळताच, गुन्हे शाखेने तेथे सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आणि नाशिकमध्ये आणून अधिकृत अटक केली.
तपास अधिक तीव्र
नाशिक शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत असून, या घोटाळ्यात सहभागी असलेल्या इतर प्रमुख संशयितांवर आणि रॅकेटवर लवकरच कारवाईचा बडगा उचलला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.