एस.के. खेडकर, (नाशिक) २५ जुलै - शहरातील उपनगर परिसरातील एका सोसायटीमधील फ्लॅटमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या देहव्यापारावर मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकून मोठा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून, त्याच्या तावडीतून ३ पीडित महिलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील छुप्या मार्गाने चालणाऱ्या वेश्या व्यवसायाविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार अवैध मसाज पार्लर, लॉज आणि खाजगी फ्लॅटची तपासणी करत असताना, पोलीस अंमलदार अतुल पाटील यांना उपनगर परिसरातील एका फ्लॅटमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली.
माहितीची खातरजमा करण्यासाठी शासकीय पंचांसह एक बनावट ग्राहक पाठवून शहानिशा करण्यात आली. प्रकार निश्चित झाल्यानंतर पथकाने तात्काळ छापा टाकला. या कारवाईत जितेंद्र गणेश शेलार (वय ३६, रा. विहीतगाव, नाशिक) हा आर्थिक फायद्यासाठी महिलांना जबरदस्तीने या व्यवसायात ढकलत असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले असून, ३ पीडित महिलांची सुटका केली आहे.
संशयित आरोपी जितेंद्र शेलार याच्याविरोधात उपनगर पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायद्यानुसार (कलम ३, ४, ५) गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.
कारवाई करणारे पथक:
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. आंचल मुदगल, सपोनि. विश्वास चव्हाणके, मपोउनि. सुवर्णा महाजन, सपोउनि. शेरखान पठाण, किशोर देसले, पोहवा गणेश वाघ, समिर चंद्रमोरे, मपोहवा लिला सुकटे, पोहवा युवराज कानमहाले, पोअं अतुल पाटील, मपोअं वैशाली घरटे तसेच विपला फाऊंडेशनच्या कर्मचाऱ्यांनी ही धडक कारवाई पार पाडली.