पंढरपूर, (प्रतिनिधी) २५ जुलै - आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल झालेल्या छत्रपती संभाजीनगर येथील एका ५४ वर्षीय भाविकाला अचानक छातीत तीव्र त्रास जाणवू लागल्याने, प्रशासनाने तातडीने 'एअर ॲम्ब्युलन्स'चा वापर करत त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला हलवले. आषाढी वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच अशा प्रकारे एअर ॲम्ब्युलन्सचा वापर करून रुग्णाचे प्राण वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
दरम्यान, रुग्णाला सोलापूर विमानतळावर आणल्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एअर ॲम्ब्युलन्समध्ये जाऊन भाविकाची भेट घेतली व योग्य ते सर्व वैद्यकीय उपचार करण्याचे निर्देश डॉक्टरांना दिले.
नेमकी घटना काय घडली?
छत्रपती संभाजीनगर येथील बाळू आसाराम पडूळ (वय ५४) हे श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे आले होते. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तात्काळ ‘तीन रस्ता’ येथील अतिदक्षता कक्षात दाखल करण्यात आले. तेथील प्राथमिक उपचारानंतर त्यांना पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवून ईसीजी (ECG) काढण्यात आला.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी त्यांना तातडीने सोलापूरला हलवण्याचा निर्णय घेतला. राज्य शासनाने वारीसाठी उपलब्ध केलेल्या एअर ॲम्ब्युलन्सच्या साह्याने त्यांना अवघ्या काही मिनिटांत सोलापूरला पोहोचवण्यात आले. सध्या सोलापूर येथील यशोधरा हॉस्पिटलमध्ये हृदयरोगतज्ज्ञांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांकडून थेट एअर ॲम्ब्युलन्समध्ये भेट
रुग्ण बाळू पडूळ यांना घेऊन एअर ॲम्ब्युलन्स सोलापूर विमानतळावर उतरताच, तेथे उपस्थित असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट ॲम्ब्युलन्सकडे धाव घेत भाविकाच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी डॉक्टरांकडून उपचाराची सविस्तर माहिती घेतली आणि रुग्णाला आवश्यक त्या सर्व अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा पुरवण्याच्या सूचना दिल्या.
या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, महापौर विनायक कोंड्याल आदी मान्यवर उपस्थित होते.
तातडीच्या वैद्यकीय सेवेचा निर्णय ठरला देवदूत!
आषाढी वारीत लाखो भाविक येतात. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत गंभीर रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळावी यासाठी राज्य शासनाने यंदाच्या वारीत प्रथमच 'एअर ॲम्ब्युलन्स' सेवा सुरू केली आहे. या सेवेमुळे ऐन गर्दीच्या काळातही एका वारकऱ्याचे प्राण वाचवण्यासाठी तातडीने मदत मिळणे शक्य झाले आहे.