Exclusive - नाशिकमध्ये CG Power चा मोठा विस्तार... विल्होळीत इतक्या कोटींची गुंतवणूक...

Share:
Main Image
Last updated: 25-Jul-2026

भावेश ब्राह्मणकर, (नाशिक) २५ जुलै - भारतातील प्रमुख उद्योग समूह असलेल्या CG Power and Industrial Solutions Limited ने नाशिकमधील विल्होळी येथील आपल्या 'एक्स्ट्रा हाय व्होल्टेज गॅस इन्सुलेटेड स्विचगियर' (EHV GIS) निर्मिती प्रकल्पाच्या विस्तारासाठी ३५.१७ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने (Board of Directors) काल पार पडलेल्या बैठकीत या ब्राऊनफिल्ड विस्तार प्रकल्पाला मंजुरी दिली. या निर्णयामुळे नाशिकमधील औद्योगिक विकासाला आणि रोजगाराला मोठी चालना मिळणार आहे.

या विस्तारासोबतच कंपनीने २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीचे (Q1) आर्थिक निकाल जाहीर केले असून, कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा (PAT) वर्षागणिक १६.३ टक्क्यांनी वाढून ३१३.०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

विस्तार का आवश्यक?

देशभरात नवीकरणीय ऊर्जा (Renewable Energy) आणि औद्योगिक विजेची मागणी झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे वीज वितरण आणि ग्रिड यंत्रणा मजबूत करण्यासाठी 'गॅस इन्सुलेटेड स्विचगियर'ची मागणी प्रचंड वाढली आहे.

नाशिकमधील विल्होळी येथील कंपनीचा विद्यमान प्रकल्प सध्या पूर्ण क्षमतेने सुरू असून उत्पादन, चाचणी आणि साठवणुकीसाठी जागा कमी पडत आहे.

कंपनीकडे मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स प्रलंबित (Order Pipeline) असल्याने हा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला.

६ महिन्यांत उत्पादन सुरू; कर्जाशिवाय होणार निधी उभारणी

Advertisement

कंपनीच्या माहितीनुसार, या विस्तारामुळे नाशिक प्रकल्पाची वार्षिक उत्पादन क्षमता सध्याच्या २२८ युनिट्सवरून थेट ६०० युनिट्सपर्यंत (FY30 पर्यंत) वाढवण्याचे नियोजन आहे.

कालावधी: या विस्ताराचे काम अवघ्या ४ ते ६ महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

निधी: या ३५.१७ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी कंपनी कोणतेही कर्ज घेणार नसून, स्वतःच्या अंतर्गत निधीतूनच (Internal Accruals) हा खर्च भागवला जाईल.

शेअर बाजारातील स्थिती

निकाल आणि विस्ताराच्या घोषणेच्या पार्श्वभूमीवर, नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर (NSE) सीजी पॉवरचा शेअर सुमारे ८४९.०० रुपयांवर व्यवहार करत होता. कंपनीचे एकूण बाजार भांडवल (Market Cap) सुमारे १,३४,८१८ कोटी रुपये झाले असून, गेल्या ५२ आठवड्यांत या शेअरने ५२५.५० ते ९८०.९० रुपयांची पातळी गाठली आहे.

स्थानिक उद्योगाला दिलासा:

नाशिकच्या विल्होळी प्रकल्पातील या अल्पमुदतीच्या विस्तारामुळे कंपनीच्या 'पावर सिस्टीम्स' विभागाला तात्काळ अतिरिक्त क्षमता मिळणार असून, कंपनीच्या भविष्यातील महसुलात मोठी भर पडणार आहे.

Advertisement

Comments

No comments yet.