नाशिककरांना घरपोच मोफत मिळणार देशी रोपे... तुम्हालाही हवी आहेत का?

Share:
Main Image
Last updated: 26-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) २६ जुलै - कुंभमेळा मंत्री तथा राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या ‘उन्नत नाशिक अभियान’ अंतर्गत ‘मिशन GREEN मान्सून’ उपक्रमाला नाशिककरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. या अभियानाच्या पाचव्या टप्प्यात आता क्यूआर कोडद्वारे नोंदणी केलेल्या नागरिकांना त्यांनी मागविलेल्या देशी प्रजातींच्या रोपांचे थेट प्रभागनिहाय वाटप केले जाणार आहे.

नाशिक अधिक हरित, सुंदर आणि पर्यावरणपूरक बनवण्यासाठी नागरिकांना त्यांच्या परिसरात वृक्षारोपण करता यावे, याकरिता विशेष क्यूआर कोड प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली होती. या मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळत आतापर्यंत ८,७५० देशी रोपांची मागणी नोंदवण्यात आली आहे.

प्रभागात असे होणार वाटप

नियोजन: स्थानिक नगरसेवक, कार्यकर्ते, भूप्रहरी आणि नाशिक महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या संयुक्त विद्यमाने वितरण होईल.

भर: केवळ वृक्षलागवडीवरच नव्हे, तर त्यांच्या दीर्घकालीन संवर्धनावर विशेष भर दिला जाणार आहे.

पहिल्या चार टप्प्यांतील यश (२५,०००+ वृक्षलागवड):

टप्पाक्षेत्र / परिसरलागवड झालेली रोपे

Advertisement

पहिला सातपूर देवराई व शिंदे ग्रामपंचायत हद्द ५,०००

दुसरा म्हसरूळ वनराई (पिकॉक हिल) व ग्रेप काउंटी ६,०००

तिसरा ऐतिहासिक नंदिनी नदीचे दोन्ही तीर ६,०००

चौथा दऱ्याई माता परिसर (दरी) व पुणे विद्यापीठ उपकेंद्र ७,०००

शासकीय मोहीम बनली लोकचळवळ

या अभियानाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मंत्री गिरीश महाजन दर रविवारी स्वतः विविध ठिकाणी उपस्थित राहून वृक्षारोपण करत आहेत. स्वयंसेवी संस्था, युवक आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांचा उत्साह वाढवत या मोहिमेला त्यांनी एका मोठ्या लोकचळवळीचे स्वरूप दिले आहे.

"हरित नाशिक हा केवळ शासनाचा संकल्प नसून प्रत्येक नाशिककराचा ध्यास आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकला देशातील सर्वात हरित, स्वच्छ आणि सुंदर शहर बनविण्याचा आमचा निर्धार आहे."

— गिरीश महाजन, कुंभमेळा मंत्री तथा जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री

Advertisement

Comments

No comments yet.