नाशिक, (प्रतिनिधी) २५ जुलै - शहरात भामट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून बंद घरे आणि दुकानांची टेहळणी करून घरफोड्यांचे सत्र सुरूच ठेवले आहे. शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या चोऱ्यांमध्ये चोरट्यांनी पतंजली स्टोअर्स आणि एक बंद घर फोडून सुमारे ८ लाख रुपयांच्या ऐवजावर डल्ला मारला आहे. या प्रकरणी इंदिरानगर आणि आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
१. इंदिरानगरमध्ये 'पतंजली स्टोअर्स'चे शटर उचकटले
पहिली घटना इंदिरानगर येथील गंधर्व नगरी भागात घडली. याप्रकरणी सचिन लक्ष्मण पाटील (रा. बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, गंधर्व नगरी) यांनी फिर्याद दिली आहे. पाटील यांचे राहत्या परिसरातच 'पतंजली स्टोअर्स' नावाचे दुकान आहे. बुधवारी (दि. २२) रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानाच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यात ठेवलेली १ लाख १५ हजारांची रोकड आणि चोरीचा पुरावा उरू नये म्हणून सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर (DVR) असा सुमारे १ लाख ३० हजारांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला. पुढील तपास पोलीस हवालदार पारणकर करत आहेत.
२. आडगाव शिवारात बंद घरातून ६.७६ लाखांची घरफोडी
दुसरी मोठी घरफोडी आडगाव शिवारातील जत्रा चौक परिसरामध्ये झाली. उषा अरुण मोरे (रा. लोटस रेसिडेन्सी, महालक्ष्मी नगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. मोरे कुटुंबीय बुधवारी (दि. २२) बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून कपाटात ठेवलेले ६ लाख ७६ हजार ५०० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड लंपास केली.
दरम्यान, याच चोरट्यांनी जवळच असलेल्या सरस्वतीनगर येथील सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन कार्यालयातही चोरीचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात एकत्रित गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक ठाकरे तपास करत आहेत.