सिडकोत दोन तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या... कारण काय?

Share:
Main Image
Last updated: 24-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २४ जुलै - सिडको परिसरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणी राहणाऱ्या दोन तरुण मुलांनी गुरुवारी (दि. २३) राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या धक्कादायक घटना घडल्या आहेत. एकाच दिवशी घडलेल्या या घटनांमुळे सिडको परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या दोन्ही तरुणांच्या आत्महत्येचे अचूक कारण अद्याप समोर आले नसून, अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लेखानगर येथे २७ वर्षीय तरुणाचे पाऊल

पहिली घटना लेखानगर भागातील भाजी बाजाराजवळ घडली. सचिन भुजंगराव काकडे (वय २७, रा. गजानन चौक, लेखानगर) या तरुणाने गुरुवारी दुपारच्या सुमारास राहत्या घरातील पत्र्याच्या शेडला असलेल्या लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. संतोष हालगे यांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

Advertisement

त्रिमुर्ती चौकात २१ वर्षीय तरुणाची आत्महत्या

दुसरी घटना त्रिमुर्ती चौक भागातील हेडगेवार नगर येथे घडली. अभिषेक प्रकाश जेजूरकर (वय २१, रा. हेडगेवार नगर) या तरुणाने गुरुवारी दुपारी अज्ञात कारणावरून राहत्या घरातील सिलिंग फॅनला कपडा बांधून गळफास घेतला. बेशुद्ध अवस्थेत वडील प्रकाश जेजूरकर यांनी त्याला तात्काळ जिल्हा रुग्णालयात नेले, परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.

पोलीस तपास सुरू

या दोन्ही दुर्घटनांबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूच्या (Accidental Death) नोंदी करण्यात आल्या आहेत. दोन तरुण मुलांनी ऐन उमेदीच्या वयात आयुष्य संपवल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणांचा पुढील तपास पोलीस हवालदार गुंड व महाजन करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.