मुंबई, (प्रतिनिधी) २२ जुलै - चीनमधील शांघाय येथे आयोजित ६७ व्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाड (IMO 2026) मध्ये भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत देशाचे नाव जागतिक स्तरावर उज्ज्वल केले आहे. ६ स्पर्धकांच्या भारतीय संघाने २ सुवर्ण आणि ४ रौप्य पदकांची कमाई केली असून, ११७ देशांच्या अनौपचारिक गुणतालिकेत भारताने ७ वा क्रमांक पटकावला आहे.
तब्बल ६६६ विद्यार्थ्यांनी भाग घेतलेल्या १९५९ पासूनच्या या ऑलिंपियाडच्या इतिहासातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी स्पर्धा ठरली आहे.
पदक विजेते भारतीय बालवैज्ञानिक
भारतीय संघातील सर्व सहा बालवैज्ञानिकांनी पदकांची कमाई करत १००% यशाची नोंद केली आहे:
आरव गुप्ता (दिल्ली) — सुवर्णपदक
एबल जॉर्ज मॅथ्यू (कर्नाटक) — सुवर्णपदक
भैरव मुरुगन (कर्नाटक) — रौप्यपदक
कणव तलवार (दिल्ली) — रौप्यपदक
संजना फिलो चाको (केरळ) — रौप्यपदक
श्रेया शंतनू मुंदडा (मुंबई, महाराष्ट्र) — रौप्यपदक
गणितीय ऑलिंपियाडमधील भारताचा ऐतिहासिक दबदबा
२०१९ पासून भारताने (२०२० मधील कोरोनाचा अपवाद वगळता) दरवर्षी किमान एक सुवर्णपदक निश्चितपणे जिंकले आहे. १९८९ मधील पदार्पणापासून भारताने जिंकलेल्या एकूण २५ सुवर्णपदकांपैकी १४ सुवर्णपदके ही गेल्या सात ऑलिंपियाडमध्येच मिळाली आहेत.
तसेच, जागतिक क्रमवारीत आघाडीच्या १० देशांमध्ये स्थान मिळवण्याची भारताची ही सलग चौथी वेळ आहे (२०२४ मध्ये भारताने ४ था तर १९९८, २००१, २०२५ आणि २०२६ मध्ये ७ वा क्रमांक पटकावला आहे). भारताने आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिंपियाडमध्ये आतापर्यंत एकूण २५ सुवर्ण, ८० रौप्य, ८० कांस्य पदके आणि २९ सन्माननीय उल्लेखांची (Honourable Mentions) कमाई केली आहे.
माजी पदकविजेत्यांचे लाभले मार्गदर्शन
भारतीय संघासोबत मॅथलोट्स प्रायव्हेट लिमिटेडचे सीईओ अनंत मुदगल (संघ प्रमुख), एचबीसीएसई मुंबईचे डॉ. मैनाक घोष (उपप्रमुख), सीएमआय चेन्नईचे सिद्धार्थ चोप्पारा (निरीक्षक 'अ') आणि एमआयटी अमेरिकेचे आदित्य मांगुडी (निरीक्षक 'ब') उपस्थित होते. विशेष म्हणजे अनंत मुदगल, सिद्धार्थ चोप्पारा आणि आदित्य मांगुडी या माजी आयएमओ पदकविजेत्यांनीच विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने (HBCSE) सर्व विजेते विद्यार्थी, मार्गदर्शक आणि पाठबळ देणाऱ्या चेन्नई मॅथेमॅटिकल इन्स्टिट्यूट (CMI), एनबीएचएम (DAE) व शिक्षण मंत्रालयाचे अभिनंदन केले आहे.