नाशिक, (प्रतिनिधी) २२ जुलै - नाशिक शहर आणि परिसरात चोरटे अन् घरफोड्या करणाऱ्या भामट्यांचा उपद्रव वाढला आहे. आठवडे व भाजीबाजारांमधील तुफान गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी दोघांना लक्ष्य केले. यात एका महिलेची सोन्याची पोत असलेली पर्स आणि एकाचा महागडा मोबाईल चोरट्यांनी हातोहात लांबवला. तर दुसऱ्या बाजूला, कुटुंबासह बाहेरगावी गेलेल्या नागरिकांची बंद घरे फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले आहेत. याप्रकरणी शहरातील आडगाव, सातपूर, गंगापूर आणि उपनगर पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भाजीबाजारात गर्दीचा फायदा घेऊन डल्ला
पहिली घटना (आडगाव):
छत्रपती संभाजी रोड भागातील रहिवासी शीतल दिनकर लवांड (रा. श्रीराम कॉलनी, कैलासनगर) या रविवारी सायंकाळी निलगिरी बाग परिसरातील भाजीबाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. गर्दीत भाजी खरेदी करत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पिशवीतून मिनी पर्स चोरून नेली. या पर्समध्ये सुमारे १ लाख ४० हजार रुपये किमतीची साडेचार तोळ्यांची सोन्याची पोत होती. याप्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार देसाई तपास करत आहेत.
दुसरी घटना (सातपूर):
सातपूर गावातील भाजी मार्केटमध्ये नंदकुमार निवृत्ती पवार (रा. शाहूनगर, खुटवडनगर) हे भाजी खरेदीसाठी गेले असता, चोरट्याने त्यांच्या खिशातील सुमारे ५० हजार रुपयांचा मोबाईल हातोहात लांबवला. याप्रकरणी सातपूर पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला असून हवालदार खरपडे पुढील तपास करत आहेत.
बंद घरे लक्ष्य; दागिने अन् रोकड लंपास
तिसरी घटना (गंगापूर रोड):
सुरेश संतोष देवरे (रा. सहदेवनगर, पंपिंग स्टेशन) हे शनिवारी कुटुंबीयांसह देवळा येथे नातेवाईकांकडे गेले होते. बंद घराची संधी साधत चोरट्यांनी कुलूप तोडून कपाटातील ३६ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे अलंकार चोरून नेले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, हवालदार गायकवाड तपास करत आहेत.
चौथी घटना (रविशंकर मार्ग):
सचिन विजय कदम (रा. नेहा पार्क, टागोरनगर, रविशंकर मार्ग) हे १० ते १५ जुलैदरम्यान कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटातील १० हजार रुपयांची रोकड लांबवली. याबाबत उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस जमादार अंबादास बकाल तपास करत आहेत.