इमारतीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर मेसेज केला... पुढं हे सगळं घडलं...

Share:
Main Image
Last updated: 21-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) २१ जुलै - सोसायटीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पार्किंग आणि पाण्याच्या अपव्ययाबाबत व्हिडीओ टाकून तक्रार केल्याचा राग मनात धरून, एकाच इमारतीत राहणाऱ्या तिघांनी सोसायटीच्या सदस्याला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. औद्योगीक वसाहतीतील शिवाजीनगर भागातील सत्यम पॅलेस अपार्टमेंटमध्ये हा प्रकार घडला. या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाले असून, याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भागवत सखाराम गिरी, सोमनाथ सदाशिव पिसाळ आणि भागवतचा भाऊ (सर्व रा. सत्यम पॅलेस अपार्टमेंट, शिवाजीनगर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी उमेश अरविंद पाटील (रा. सत्यम पॅलेस, विठ्ठलरुक्मिणी कॉलनी, शिवाजीनगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

Advertisement

नेमका प्रकार काय घडला?

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित उमेश पाटील आणि संशयित हे एकाच इमारतीत वास्तव्यास असून ते सोसायटीचा कारभार पाहतात. संशयित हे सोसायटीचे पदाधिकारी असल्याने इमारतीच्या पार्किंगमध्ये कुठेही अस्ताव्यस्त वाहने उभी करत असत, तसेच रोज बोअरवेलच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर नासाडी करून गाड्या धुत असत.

रोजच्या या प्रकाराला कंटाळून पाटील यांनी संशयितांचा गाडी धुतानाचा व्हिडीओ तयार केला आणि तो सोसायटीच्या अधिकृत व्हॉट्सॲप ग्रुपवर पोस्ट केला. या गोष्टीचा तीव्र राग धरून संशयितांनी पाटील यांना गाठले आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या अचानक झालेल्या हल्ल्यात पाटील जखमी झाले. घटनेनंतर त्यांनी थेट गंगापूर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार ढमाले करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.