मनोहर शिंदे, (नाशिक) २० जुलै - नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीला वेग आला असून, या अंतर्गत सुरू असलेली विविध घाट, रस्ते आणि पायाभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व मार्च २०२७ या विहित मुदतीतच पूर्ण करा, असे स्पष्ट निर्देश राज्याचे आपत्ती व्यवस्थापन तथा कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. कामांचा वेग वाढवण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आपापसातील समन्वय अधिक मजबूत करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरणाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक रविवारी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला महापौर हिमगौरी आडके-आहेर, उपमहापौर विलास शिंदे, प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्यासह जलसंपदा आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विविध विभागांनी एकत्रितपणे अडचणी सोडवाव्यात
बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांनी जलसंपदा विभाग आणि महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत नाशिक तसेच त्र्यंबकेश्वर येथे सुरू असलेल्या विविध घाटांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेतली. कामांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, आवश्यक भूसंपादन आणि प्रलंबित बाबींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
"कुंभमेळ्याच्या कामात कोणतीही दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही. जलसंपदा, महसूल, भूमी अभिलेख, पोलीस आणि वन विभागाने एकत्रित येऊन तांत्रिक व प्रशासकीय अडचणी तातडीने मार्गी लावाव्यात आणि कामांना गती द्यावी," असे आवाहन मंत्री महाजन यांनी केले.
‘या’ प्रमुख कामांचा घेण्यात आला आढावा
बैठकीत जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांनी सादरीकरणाद्वारे सुरू असलेल्या प्रकल्पांची माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने खालील कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला:
शाही स्नानासाठी नवीन घाट: गोदावरी-कपिला नदी संगम, टाकळी येथील गोदावरी-नंदिनी नदी संगम आणि दसक पूल परिसरातील उजव्या व डाव्या तीरांवर नवीन घाट बांधणे.
ओढा राम घाट विकास: गोदावरी नदीच्या डाव्या तीरावर ओढा येथील गणपती मंदिराजवळ शाही स्नानासाठी विशेष 'ओढा राम घाट' व परिसराचा विकास करणे.
त्र्यंबकेश्वर घाट व पाणी योजना: श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे गोदावरी नदीकिनारी नवीन घाटांचे बांधकाम करणे. तसेच त्र्यंबकेश्वर परिसर कायमस्वरूपी प्रवाहित ठेवण्यासाठी 'गौतमी गोदावरी धरण ते त्र्यंबकेश्वर उपसा प्रणाली योजना' पूर्ण करणे.
रबर बंधारा: गोदावरी नदीवरील नंदिनी संगमाजवळ आधुनिक रबर बंधारा (बलून बंधारा) बांधणे.
बैठकीच्या शेवटी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि मनपा आयुक्त मनीषा खत्री यांनी कुंभमेळ्याच्या नियोजनाबाबत प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या इतर महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली.
महत्त्वाचे निर्णय व डेडलाईन:
मार्च २०२७: सर्व घाटांची आणि पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याची अंतिम मुदत.
विभागीय समन्वय: भूसंपादन, वन विभाग आणि पोलिसांशी संबंधित बाबी महसूल अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून सोडवण्याच्या सूचना.
गुणवत्तेवर भर: वेळेसोबतच कामाच्या दर्जाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे कडक निर्देश.