बुलेट ट्रेनसाठी होणार समुद्राखाली देशातील पहिला बोगदा... ५०० हत्तींचे वजन, ४ मजली इमारतीची उंची...

Share:
Main Image
Last updated: 19-Jul-2026

ठाणे, (प्रतिनिधी) १९ जुलै -  मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या (Bullet Train Project) कामात आज आणखी एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा टप्पा पार पडला. महाराष्ट्रातील सावली (घणसोली) येथून विक्रोळीच्या दिशेने जाणाऱ्या देशातील पहिल्या 'समुद्राखालच्या बोगद्याच्या' (Undersea Tunnel) खोदकामाला दुसऱ्या टनेल बोरिंग मशीनने (TBM) अधिकृतपणे सुरुवात केली आहे. कोणत्याही रेल्वे कॉरिडॉरसाठी अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच समुद्राखालचा बोगदा ठरणार आहे.

७ किलोमीटरचा प्रवास समुद्राखालून!

या प्रकल्पांतर्गत एकूण २१ किमी लांबीचा भुयारी बोगदा तयार केला जात आहे. यातील सावली ते विक्रोळी दरम्यानच्या १० किलोमीटरच्या टप्प्यापैकी तब्बल ७ किलोमीटरचा बोगदा ठाणे खाडीजवळ थेट समुद्राखालून जाणार आहे. २१ किमीच्या एकूण भागापैकी १६ किमीचा भाग टनेल बोरिंग मशीनने, तर उर्वरित ५ किमीचा भाग एनएटीएम (NATM) तंत्रज्ञानाच्या सहाय्याने खोदला जात आहे. पहिल्या टीबीएमने ५ जुलै २०२६ रोजी विक्रोळीकडून बीकेसीच्या दिशेने ६ किमी अंतराचे काम आधीच सुरू केले आहे.

 ५०० हत्तींचे वजन, ४ मजली इमारतीची उंची: जाणून घ्या 'टीबीएम'ची वैशिष्ट्ये

भारतात रेल्वे बोगद्याच्या बांधकामासाठी आतापर्यंत वापरण्यात आलेल्या सर्वात मोठ्या मशिनपैकी ही एक आहे:

कटरहेडचा व्यास: १३.६ मीटर (सुमारे ४ मजली इमारतीच्या उंचीइतका)

मशिनचे वजन: ३,२०0 टन (सुमारे ५०० आशियाई हत्तींच्या वजनाइतके)

मशिनची एकूण लांबी: ९६ मीटर (एका फुटबॉल मैदानाच्या लांबीइतकी)

Advertisement

तंत्रज्ञान: हे यंत्र 'मिक्सशील्ड' प्रकारातील, निमस्वयंचलित आणि स्लरी-आधारित आहे.

 दाट लोकवस्तीच्या मुंबईसाठी 'मिक्सशील्ड' तंत्रज्ञान वरदान

मुंबई उपनगरातील दाट लोकवस्तीच्या शहरी भागात बोगद्याचे काम करताना जमिनीवरील वाहतूक आणि जनजीवनावर कोणताही परिणाम होऊ नये, तसेच जमीन खचण्याचा धोका टाळण्यासाठी 'मिक्सशील्ड' तंत्रज्ञानाची विशेष निवड करण्यात आली आहे. यात उत्खननादरम्यान बोगद्याचा पुढचा भाग स्थिर ठेवण्यासाठी 'प्रेशराइज्ड लिक्विड बेंटोनाइट स्लरी सर्किट' कार्यरत असते. यामुळे बोगद्याच्या काँक्रीट सेगमेंट रिंग उभारणीचे काम आणि बोगद्याचे उत्खनन ही दोन्ही कामे एकाच वेळी समांतर पद्धतीने होतात, ज्यामुळे कामाचा वेग कमालीचा वाढतो.

 १२ मजली इमारतीएवढ्या खोल शाफ्टचे 'अभियांत्रिकी' आव्हान

या अवाढव्य मशीनला भूमिगत मार्गावर उतरवण्यासाठी सावली येथे तब्बल ३९ मीटर खोल (सुमारे १२ मजली इमारतीच्या उंचीइतका) लाँचिंग शाफ्ट उभारण्यात आला आहे. मर्यादित जागेमुळे मशीन वेगवेगळ्या भागांमध्ये खाली उतरवून त्याची आतमध्ये जोडणी करण्यात आली. बोगद्याच्या सुरक्षेसाठी आणि गळती रोखण्यासाठी दुहेरी स्तराच्या इथिलीन प्रॉपिलीन डायीन मोनोमर गॅस्केट आणि जलशोषक सील वापरून बोगदा पूर्णपणे जलरोधक (Waterproof) केला जात आहे.

कामकाजाचे चोवीस तास 'लाईव्ह' मॉनिटरिंग

बोगद्यामध्ये कामगारांच्या सुरक्षेसाठी मिथेन, ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड वायूंचे सातत्याने निरीक्षण करणारी बहु-वायू प्रणाली बसवण्यात आली आहे. तसेच जमिनीवर कुठेही कंपन किंवा भूकंपासारख्या लहरी निर्माण झाल्यास त्याचे तातडीने मोजमाप करण्यासाठी भूकंपलेखक (Seismograph) आणि टिल्ट मीटर यांसारखी आधुनिक उपकरणे बसवून प्रत्यक्ष वेळेत (Real-Time) निरीक्षण केले जात आहे.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.