नाशकात मतदार यादीचे काम कसे सुरू आहे?  सीईओ चोक्कलिंगम थेट नाशिकच्या सोसायट्यांमध्ये आणि घराघरात...

Share:
Main Image
Last updated: 19-Jul-2026

दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १९ जुलै - "मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) अभियानाचे काम अधिक गतिमान, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करण्यात यावे. राज्यातील कोणताही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये, यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी (BLO) घराघरांत पोहोचून गणनापत्रके भरून घ्यावीत. तसेच मतदारांच्या स्वयं-नोंदणी (Self Enumeration) प्रक्रियेला गती देऊन नागरिकांमध्ये व्यापक जनजागृती करावी," अशा सूचना राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा अपर मुख्य सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिल्या.

मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांनी आज नाशिक शहरातील विविध विधानसभा मतदारसंघांतील मतदान केंद्रांना अचानक भेटी देऊन सुरू असलेल्या पुनरीक्षण मोहिमेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या दौऱ्यात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, उप जिल्हा निवडणूक अधिकारी मधुमती सरदेसाई यांच्यासह नाशिकमधील सर्व मतदारसंघांचे मतदार नोंदणी अधिकारी उपस्थित होते.

नाशिकमधील 'या' मतदारसंघांत प्रत्यक्ष पाहणी व निर्देश:
मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नाशिकमधील ४ प्रमुख विधानसभा मतदारसंघांत फिरून प्रत्यक्ष कामाची पडताळणी केली:

१२३ - नाशिक पूर्व (बळी मंदिर परिसर): येथील मोठ्या सोसायट्यांमध्ये आयोजित विशेष शिबिराची त्यांनी पाहणी केली. सन २००२ च्या मतदार यादीत नाव उपलब्ध नसलेल्या मतदारांच्या बाबतीत कोणती कायदेशीर कार्यवाही करावी, याबाबत त्यांनी घटनास्थळीच अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

१२५ - नाशिक पश्चिम (उत्तमनगर, सिडको): सिडको भागात घराघरांत सुरू असलेल्या मोहिमेची पाहणी करत त्यांनी 'किरण भालेराव' या मतदाराच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली व ईएफ (EF) फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेची माहिती घेतली.

Advertisement

१२६ - देवळाली (गोवर्धन): गोवर्धन येथील जिल्हा परिषद शाळेत बीएलओ आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींशी (BLA) संवाद साधला. मतदार यादीतील समान छायाचित्र (Photo Similar Entries) असलेल्या संशयास्पद नोंदींची तातडीने पडताळणी करून बोगस नावे वगळण्याचे आदेश त्यांनी दिले.

१२४ - नाशिक मध्य (वडाळा गाव): वडाळा गावात प्रत्यक्ष मतदारांच्या घरी जाऊन गणनापत्रके भरून घेण्याच्या प्रक्रियेची गती तपासली.

फॉर्म संगणकीकरणाचे काम वेळेत पूर्ण करा
दौऱ्याच्या शेवटी मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी नाशिक तहसील कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू असलेल्या ईएफ (Enumeration Form) संगणकीकरणाच्या (Digitization) कामाची सखोल पाहणी केली. संगणकीकरणाचे हे काम अत्यंत संवेदनशील असल्याने ते वेळेत, पूर्णपणे अचूक व त्रुटीविरहित पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच प्रलंबित डेटा एन्ट्रीच्या कामाला युद्धपातळीवर गती देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.

नागरिकांना आवाहन:
"लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी अचूक मतदार यादी अत्यंत आवश्यक आहे. सर्व पात्र नागरिकांनी आपल्या घरी येणाऱ्या निवडणूक प्रतिनिधींना सहकार्य करावे आणि स्वयं-नोंदणी सुविधेचा वापर करून आपली माहिती अद्ययावत ठेवावी."
— एस. चोक्कलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.