नाशिकमध्ये लुटारूंचा हैदोस... तरुणांना बेदम मारहाण करत लुटले...

Share:
Main Image
Last updated: 18-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १८ जुलै - शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून जबरी चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दगडफेक आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत लुटालूट केल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. यात एका विद्यार्थ्याकडून ५ हजार रुपयांची रोकड, तर एका मजुराचा मोबाईल लुटारूंनी हिसकावून नेला. याप्रकरणी अंबड आणि सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना: धन्वंतरी कॉलेजच्या गेटवर विद्यार्थ्याला लुटले
पहिली घटना अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कामटवाडा भागातील धन्वंतरी मेडिकल कॉलेजजवळ राहणारा १९ वर्षीय विद्यार्थी प्रशांत नंदलाल मिस्तरी हा गुरुवारी (दि. १६) सायंकाळच्या सुमारास कॉलेजच्या गेटसमोरील गवांडे दूध डेअरी भागात उभा होता.
त्याच वेळी त्याच्या ओळखीच्या बंड्या ऊर्फ धनेश उन्हाळे, विक्की दोंदे, प्रेम गजरे आणि रोशन खर्डे (सर्व रा. कामटवाडा) यांनी त्याला गाठले. "तू रोशन खर्डेला फोन का करत नाहीस?" असा जाब विचारत संशयितांनी प्रशांतला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने संशयितांनी त्याला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली, तसेच त्याच्यावर दगडफेक केली. या हल्ल्यात प्रशांत जखमी झाला. याचाच गैरफायदा घेत संशयितांनी प्रशांतच्या खिशातील ५ हजार रुपयांची रोकड बळजबरीने काढून घेतली आणि घटनास्थळावरून पोबारा केला. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून उपनिरीक्षक मद्रुपकर पुढील तपास करत आहेत.

Advertisement

दुसरी घटना: आयटीआय वसतिगृहासमोर मजुरावर हल्ला
दुसरी घटना सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्र्यंबक रोडवरील आयटीआय कॉलेजच्या पाठीमागे घडली. भगवती चौक, स्वारबाबानगर येथील मजूर सागर सरदारीलाल राजपूत (वय ३१) हे शुक्रवारी (दि. १७) दुपारी आपले काम आटोपून आयटीआयच्या पाठीमागील रस्त्याने पायी घराकडे जात होते.

ते आयटीआय वसतिगृहासमोर आले असता, तेथे उभ्या असलेल्या एका अज्ञात भामट्याने त्यांची वाट अडवली. कुठलेही कारण नसताना संशयिताने सागर यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. एवढ्यावरच न थांबता संशयिताने त्यांच्यावर दगड फेकून मारला. सागर राजपूत जखमी होताच, संशयिताने त्यांच्या खिशातील मोबाईल फोन बळजबरीने हिसकावून घेतला आणि पळ काढला. याप्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.