शहादा, (प्रतिनिधी) १८ जुलै - "दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रकाशा (ता. शहादा) येथील तीर्थक्षेत्र विकास आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयार केलेला ११७ कोटी रुपयांचा विकास आराखडा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंजुरीसाठी सुपूर्द करण्यात आला आहे. कुंभमेळा अवघ्या वर्षाभरावर आला असल्याने या कामांना तातडीने प्रशासकीय मान्यता मिळवून देऊन ती वेळेत पूर्ण केली जातील," अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
पालकमंत्री मुश्रीफ यांनी आज प्रकाशा येथील प्रसिद्ध श्री केदारेश्वर देवस्थानचे दर्शन घेऊन गौतमेश्वर तीर्थस्थळाची पाहणी केली. त्यानंतर शहादा तहसील कार्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय आढावा बैठक पार पडली. या बैठकीला माजी खासदार डॉ. हिना गावीत, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल आदी उपस्थित होते.
DPDC मधून तात्पुरता निधी देण्याचे निर्देश
कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे सांगत पालकमंत्र्यांनी मुख्य निधी मिळेपर्यंत जिल्हा नियोजन समितीतून (DPDC) तात्पुरता आराखडा तयार करून तातडीने सुविधा निर्माण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
शासकीय विभागांना महत्त्वपूर्ण सूचना:
महावितरण व पोलीस: स्मार्ट मीटर बसवताना नागरिकांचा विरोध असल्यास त्यांना विश्वासात घ्यावे. तसेच पोलिसांनी गावठी दारू व गुटखा विक्रीवर कडक कारवाई करावी.
लाडकी बहीण व निराधार योजना: ‘लाडकी बहीण योजने’त कमी झालेल्या अर्जांची कारणे शोधून योग्य ती कारवाई करावी आणि ‘संजय गांधी निराधार योजने’चे प्रलंबित मानधन त्वरित अदा करावे.
शिक्षण व घरकुल: जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी गावातील सुशिक्षित तरुणांना मानधनावर इंग्रजी, गणित व विज्ञान विषय शिकवण्यासाठी शिक्षण समितीमार्फत प्रोत्साहित करावे. घरकुल लाभार्थ्यांना वेळेवर हप्ते व पुरेशी वाळू उपलब्ध करून द्यावी.
विषबाधित विद्यार्थ्यांची केली विचारपूस
काही दिवसांपूर्वी समाज कल्याण विभागाच्या अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत घडलेल्या विषबाधेच्या घटनेची गंभीर दखल घेत पालकमंत्र्यांनी या वसतिगृहाला प्रत्यक्ष भेट दिली. त्यांनी विद्यार्थ्यांच्या निवासस्थानाची पाहणी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची आणि जेवणाच्या दर्जाची विचारपूस केली.