Exclusive अमेरिकेत घुमला पंढरीच्या वारीचा गजर... नाशिकच्या सूनबाईचा 'युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड'मध्ये प्रबंध सादर...

Share:
Main Image
Last updated: 18-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १८ जुलै - महाराष्ट्राची शतकानुशतकांची सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरा असलेल्या पंढरीच्या वारीचा गजर आता थेट सातसमुद्रापार अमेरिकेत घुमला आहे. नाशिक व खान्देशची कन्या आणि मालेगावच्या सायंकर कुटुंबाची सुनबाई अंकिता सुरेश येवले - सायंकर यांनी अमेरिकेतील प्रसिद्ध 'युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड' (University of Maryland) येथे वारीच्या पायाभूत सुविधांवर आधारित आपला शोधप्रबंध (Thesis) यशस्वीपणे सादर केला आहे. युनिव्हर्सिटीने या प्रबंधाची दखल घेत तो आपल्या अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केला असून, जगभरातून या संशोधनाचे कौतुक होत आहे.

जगभरात अनेक विषय असताना मराठी अस्मिता आणि परंपरा याचा विचार करून तिने वारीचा विषय निवडला, हे विशेष. 'वारी: अ सेक्रेड जर्नी' (Wari: A Sacred Journey) असा अंकिता यांच्या प्रबंधाचा विषय असून, अमेरिकेतील नामवंत मार्गदर्शक रोनित आयसेनबॅक (Ronit Eisenbach) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी हे संशोधन पूर्ण केले. अंकिता यांनी अमेरिकेतच आर्किटेक्चरमध्ये एमएस (MS in Architecture) पूर्ण केले आहे.

वारी प्रत्यक्ष पायी चालून केले संशोधन

अंकिता यांनी गेल्या वर्षी (२०२५ मध्ये) आपले सासरे (मालेगाव अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयातील निवृत्त नायब तहसीलदार) रवींद्र काशिनाथ सायंकर आणि सासू छाया सायंकर यांच्यासोबत पहिल्या दिवसापासून ते थेट आषाढी एकादशीपर्यंत संपूर्ण पंढरीची वारी पायी पूर्ण केली.

पाठ आणि गुडघेदुखीचा त्रास असूनही त्यांच्या सासूबाई वारीत सहभागी झाल्या कारण सुनेने निवडलेला विषय आणि अभ्यास करण्याची तिची तयारी. या निमित्ताने पांडुरंगाचे दर्शन घडेल आणि आयुष्यात वारीचा अनुभव घेता येईल, हा त्यामागचा उद्देश होता.

वारकऱ्यांसोबत चालताना आणि राहताना त्यांनी शासनाच्या वतीने वारी दरम्यान दिल्या जाणाऱ्या तात्पुरत्या सुविधांचा जवळून अभ्यास केला. वारी संपल्यानंतर दरवर्षी या सुविधांवर होणारा खर्च आणि त्यांचे तात्पुरते स्वरूप लक्षात घेऊन, त्याच पालखी तळांवर वर्षभर उपयुक्त ठरतील अशा कायमस्वरूपी सुविधा कशा निर्माण करता येतील, यावर त्यांनी संशोधन सुरू केले.

Advertisement

काय आहे अंकिता यांच्या प्रबंधाचे उद्दिष्ट व निष्कर्ष?

अंकिता यांनी आपल्या प्रबंधात पालखी तळांच्या परिसरात अशा 'बहुउद्देशीय संरचनांची' (Multipurpose Prototypes) संकल्पना मांडली आहे, ज्या वारीच्या काळात वारकऱ्यांसाठी हक्काचे निवासस्थान व मदत केंद्र ठरतील आणि वारी संपल्यानंतर उर्वरित ३६४ दिवस स्थानिक ग्रामीण समुदायाच्या विविध गरजा पूर्ण करतील.

प्रस्तावित रचनेतील मुख्य वैशिष्ट्ये:

अंकिता यांनी सुचविलेल्या आराखड्यात सामुदायिक स्वयंपाकघर, कपडे धुण्यासाठी अंगण, बहुउद्देशीय सभागृह, खुली वर्गखोली, ज्येष्ठ वारकऱ्यांसाठी सामुदायिक अतिथीगृह, सावलीयुक्त पायवाटा, व्हरांडे आणि भक्तीमय संमेलनासाठी खुल्या जागांचा समावेश आहे. हा लवचिक आराखडा वारीच्या काळात भाविकांची सोय करेल आणि वर्षभर स्थानिक शाळा, मंदिरे व ग्रामस्थांसाठी अतिशय उपयुक्त ठरेल. हा पॅटर्न वारी मार्गावरील इतरही पालखी तळांवर सहज राबवता येण्यासारखा आहे.

कौटुंबिक पाठबळ आणि आनंद

अंकिता या पाचोरा येथील प्रसिद्ध जीनिंग व्यावसायिक सुरेश रंगनाथ येवले आणि लता येवले यांच्या कन्या आहेत. २०२२ पासून त्या अमेरिकेत उच्चशिक्षण घेत आहेत. त्यांचे पती श्रेयश सायंकर हे 'एमएस इन कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट' पूर्ण करून सध्या वॉशिंग्टन डीसी येथे एका नामांकित कन्स्ट्रक्शन कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

महाराष्ट्राच्या वारीचा अभ्यास करून ग्रामीण भागाचा कायापालट करणारा आणि वारकऱ्यांचे कष्ट कमी करणारा हा प्रकल्प अमेरिकेतील विद्यापीठाने स्वीकारल्यामुळे सायंकर आणि येवले कुटुंबासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून अंकिता यांच्यावर कौतुकाचा आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

Comments

No comments yet.