भरधाव वाहनाने कट मारला... वयोवृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू...

Share:
Main Image
Last updated: 17-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ जुलै - भरधाव जाणाऱ्या एका अज्ञात वाहनाने हुलकावणी (कट) मारल्याने झालेल्या अपघातात एका ६४ वर्षीय वयोवृद्ध दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आडगाव येथील दत्तमंदिर भागात घडली आहे. या अपघातप्रकरणी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस अज्ञात वाहनचालकाचा शोध घेत आहेत. निवृत्ती फकिरा बोराडे (वय ६४, रा. पोकार कॉलनी, दिंडोरी रोड, नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे.

दत्त मंदिरासमोर झाला अपघात

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवृत्ती बोराडे हे गेल्या शनिवारी (दि. ११) दुपारच्या सुमारास नाशिकहून आडगावच्या दिशेने आपल्या दुचाकीवरून जात होते. ते आडगाव बसस्थानक परिसरातील दत्तमंदिरासमोर आले असता, पाठीमागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरात कट मारला.

Advertisement

वाहनाचा धक्का लागल्याने बोराडे यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते रस्त्यावर कोसळले. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि प्रचंड रक्तस्राव झाला.

५ दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू

अपघात घडल्यानंतर स्थानिक नागरिक संकेश चांदवडकर यांनी मानवता दाखवत बोराडे यांना तातडीने नजीकच्या लोकमान्य हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. गेल्या पाच दिवसांपासून त्यांची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, गुरुवारी (दि. १६) उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. हॉस्पिटलचे डॉ. ओमकार गवळी यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पोलीस हवालदार देवरे पुढील तपास करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.