भररस्त्यात भांडण सुरू होते... मध्यस्थी करायला गेले अन् हे गंभीर घडलं...

Share:
Main Image
Last updated: 17-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १७ जुलै - रस्त्याने जाताना 'आपआपसात का भांडता?' असा सहज प्रश्न विचारणाऱ्या एका ५६ वर्षीय प्रौढाला तीन जणांच्या टोळक्याने कोयत्याचा धाक दाखवत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना आनंदवली भागात घडली आहे. या गुंडगिरीच्या प्रकारात मारहाण करणाऱ्यांनी पीडित व्यक्तीचा मोबाईल फोन जमिनीवर फेकून फोडत नुकसानही केले. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल सुनील पवार (रा. शिवनगर, आनंदवली) आणि त्याचे दोन अनोळखी साथीदार अशी मारहाण करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी जगन गंगाराम लहांगे (वय ५६, रा. कोळीवाडा, आनंदवली) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

मध्यस्थी करण्याचा प्रयत्न नडला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जगन लहांगे हे बुधवारी (दि. १५) सकाळच्या सुमारास आनंदवली येथील हनुमान मंदिरासमोरून पायी जात होते. त्यावेळी संशयित विशाल पवार आणि त्याचे दोन मित्र सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर उभे राहून एकमेकांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत भांडण करत होते.

Advertisement

रस्त्यावरून जाणाऱ्या लहांगे यांनी नागरिकत्वाच्या नात्याने त्यांना 'तुम्ही आपआपसात का भांडण करताय?' असा प्रश्न विचारून वाद शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा राग आल्याने संतप्त झालेल्या त्रिकुटाने थेट लहांगे यांनाच लक्ष केले.

कोयता उगारून दहशत माजवण्याचा प्रयत्न

टोळक्याने लहांगे यांना घेरून आधी अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. त्यानंतर त्यातील एकाने सोबत आणलेला तीक्ष्ण कोयता काढून लहांगे यांच्यावर उगारला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. भीतीचे वातावरण तयार केल्यानंतर संशयितांनी लहांगे यांना जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. या गोंधळात लहांगे यांचा मोबाईल हिसकावून तो खाली फेकून फोडण्यात आला. मारहाण केल्यानंतर संशयित घटनास्थळावरून पसार झाले. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पगार करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.