दीपकनाथ गांगुर्डे, (नाशिक) १८ जुलै - केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्या राष्ट्रीय जल अभियानांतर्गत आयोजित ५५ व्या 'वॉटर सिरीज' वेबिनारमध्ये नाशिक जिल्ह्याने जलसंवर्धन व जलव्यवस्थापनात केलेल्या कौतुकास्पद कार्याची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. 'Best Practices of Water Management' (जलव्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धती) या विषयावरील राष्ट्रीय वेबिनारमध्ये नाशिकचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आयुष प्रसाद यांनी विशेष निमंत्रित वक्ते म्हणून हजेरी लावली. यावेळी त्यांनी लोकसहभाग, विविध विभागांमधील समन्वय आणि शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतून नाशिक जिल्ह्यात उभे राहिलेले जलसंवर्धन मॉडेल देशासमोर मांडले.
या राष्ट्रीय वेबिनारमध्ये राष्ट्रीय जल अभियानाच्या मिशन संचालक अर्चना वर्मा प्रामुख्याने उपस्थित होत्या. या महत्त्वपूर्ण व्यासपीठावर देशभरातून केवळ दोनच जिल्हाधिकाऱ्यांना सादरीकरणाची संधी मिळाली, ज्यामध्ये मध्यप्रदेशातील सिधी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विकास मिश्रा आणि महाराष्ट्रातून नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचा समावेश होता.
जलसुरक्षेसाठी विविध योजनांचा 'नाशिक पॅटर्न'
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सादरीकरणादरम्यान नाशिक जिल्ह्यात जलसुरक्षा अधिक सक्षम करण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने:
जलयुक्त शिवार अभियान २.० आणि गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार योजना.
नाला खोलीकरण, रुंदीकरण आणि कृत्रिम भूजल पुनर्भरण विहिरी (रिचार्ज शाफ्ट).
पर्जन्यजल संधारण (Rainwater Harvesting) आणि सूक्ष्म सिंचन पद्धती.
जलअर्थसंकल्प (वॉटर बजेटिंग), जलकार्यक्षम शेती आणि विशेष लक्षवेधी ठरलेला 'जलतारा' उपक्रम.
वनहक्क कायद्यातील जमिनींवर विशेष प्रयोग
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी नाशिक प्रशासनाचा एक महत्त्वाचा आणि संवेदनशील उपक्रम देशासमोर मांडला. वनहक्क कायदा (FRA) अंतर्गत जिल्ह्यातील ज्या लाभार्थ्यांना जमिनी वितरित करण्यात आल्या आहेत, त्या जमिनींवर प्रशासनामार्फत विशेष मृद व जलसंधारणाची कामे केली जात आहेत. यामुळे या दुर्गम भागातील जमिनी उत्पादक आणि शाश्वत होऊन आदिवासी बांधवांना मोठा दिलासा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन करून भूजल पातळी वाढवण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी दिली.
"'कॅच द रेन' अभियानाचा मुख्य उद्देश पावसाच्या प्रत्येक थेंबाचे स्थानिक पातळीवर संवर्धन करून जलसुरक्षा अधिक सक्षम करणे हा आहे. यासाठी शासन, ग्रामपंचायती, विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि सामान्य नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवला आहे. या लोकसहभागाच्या बळावरच नाशिक जिल्ह्यात जलसंवर्धनाला आता एका मोठ्या लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे."
— आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक
देशभरातील प्रशासनासमोर 'नाशिक मॉडेल'
या वेबिनारच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील जलव्यवस्थापनाचे यशस्वी मॉडेल, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि लोकसहभागाची पद्धत देशभरातील विविध राज्यांतील जिल्हा प्रशासन, आयएएस अधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांसमोर सादर करण्यात आली. यामुळे नाशिक जिल्ह्याच्या जलसंधारण कार्याचा ठसा राष्ट्रीय स्तरावर उमटला आहे.