फिल्मी स्टाईल थरार... टोलनाक्यावर झाडू मारत खेळ खल्लास... नाशिक पोलिसांना सर्वात मोठे यश...

Share:
Main Image
Last updated: 17-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १७ जुलै - शहर आणि ग्रामीण भागात धुमाकूळ घालणाऱ्या भिवंडीच्या एका सराईत चैनस्नॅचरला नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट २ च्या पथकाने अत्यंत फिल्मी स्टाईलने बेड्या ठोकल्या आहेत. तब्बल ४८ गुन्ह्यांमध्ये पोलिसांना गुंगारा देणाऱ्या या भामट्याचा माग काढण्यासाठी पोलिसांनी १८० किलोमीटर अंतरावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. अखेर घोटी टोलनाक्यावर सफाई कामगारांचे वेशांतर करून पोलिसांनी या सराईत गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून सुमारे २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सरफराज फिरोज बेग उर्फ इराणी (वय ३६, मूळ रा. संजयनगर, भिवंडी; सध्या रा. पाटीलनगर, आंबिवली, ठाणे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित चैनस्नॅचरचे नाव आहे.

तोतया पोलीस आणि पत्ता विचारण्याची मोडस ऑपरेंडी

शहरात गेल्या काही दिवसांपासून तोतया पोलीस बनून किंवा पत्ता विचारण्याचा बहाणा करून नागरिकांचे, विशेषतः महिलांचे लाखोंचे दागिने लांबवण्याचे गुन्हे वाढले होते. सुटाबुटात स्पोर्ट्स बाईकवरून येणारा हा भामटा चोरी करून पसार होत असल्याने पोलीस यंत्रणा चक्रावून गेली होती. युनिट २ चे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या पथकाने या चोरट्याला पकडण्यासाठी शहरातील चारही बाजूंचे रस्ते आणि हायवेवरील तब्बल १८० किमी अंतराचे सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषण केले. यादरम्यान सहाय्यक उपनिरीक्षक शंकर काळे आणि हवालदार मनोज परदेशी यांना हा भामटा नाशिकच्या दिशेने येणार असल्याची पक्की माहिती मिळाली.

टोलनाक्यावर झाडू मारत पोलीस दबा धरून बसले

Advertisement

संशयित आरोपी उपनगर हद्दीत चैनस्नॅचिंग करण्यासाठी मुंबई-नाशिक महामार्गाने येणार असल्याचे समजताच पोलिसांनी घोटी टोलनाका गाठला. पोलिसांना पाहून आरोपी पळून जाऊ नये, म्हणून पथकातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ सफाई कामगारांचे कपडे परिधान केले आणि टोलनाक्यावर साफसफाईचे काम सुरू केले. स्पोर्ट्स बाईकवरून सुटाबुटात आलेल्या सरफराजला खबऱ्याने दिलेल्या वर्णनावरून पोलिसांनी ओळखले आणि तो काही समजण्याच्या आतच सफाई कामगारांच्या वेशातील पोलिसांनी झडप घालून त्याला जाळ्यात ओढले.

४८ गुन्ह्यांचा रेकॉर्ड; ७ गुन्हे तात्काळ उघड

संशयित सरफराज हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून, त्याने शहर आणि ग्रामीण पोलिसांना तब्बल ४८ गुन्ह्यांमध्ये हुलकावणी दिली होती. पोलिसांच्या खाक्या दाखवताच त्याने नाशिक शहरातील उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील २, इंदिरानगर येथील ३, ओझरमधील १ आणि ठाणे जिल्ह्यातील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीतील १ अशा एकूण ७ मोठ्या गुन्ह्यांची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून १ लाख ८९ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे अलंकार व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या पथकाने केली कामगिरी

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके व युनिटचे प्रभारी हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक डॉ. समाधान हिरे, उपनिरीक्षक संजय सानप, यशवंत बेंडकोळी, बाळू शेळके, जमादार शंकर काळे, हवालदार सुनील आहेर, अतुल पाटील, प्रकाश महाजन, वाल्मिक चव्हाण, मनोज परदेशी व अंमलदार प्रवीण वानखेडे आदींच्या पथकाने ही धडक कामगिरी बजावली.

Advertisement

Comments

No comments yet.