नाशिक, (प्रतिनिधी) १५ जुलै - उच्च न्यायालयाच्या जप्ती आदेशाचे उल्लंघन करून बँकेने सील केलेल्या मालमत्तेचा ताबा बेकायदेशीरपणे घेतल्याचा धक्कादायक प्रकार पंचवटीतील दत्तनगर भागात समोर आला आहे. संशयितांनी महिलांना पुढे करून तैनात सुरक्षा रक्षकाला धमकावले, धक्काबुक्की केली आणि बँकेचे सील तोडून पुन्हा मिळकतीवर ताबा मिळवला. याप्रकरणी डोंबिवली नागरी बँकेच्या अधिकाऱ्याने दिलेल्या तक्रारीवरून पंचवटी पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्ज थकवल्याने झाली होती कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली नागरी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सखाराम गावडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. दत्तनगर येथील गुप्ता कुटुंबीयांनी बँकेकडून कर्ज घेतले होते. मात्र, दीर्घकाळ कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँकेने कायदेशीर रित्या जप्तीची कारवाई सुरू केली होती. या कारवाईला कर्जदारांकडून सतत विरोध होत असल्याने बँकेने अखेर उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
उच्च न्यायालयाच्या स्पष्ट आदेशान्वये, सोमवारी (दि. १३) बँक प्रतिनिधी पोलीस बंदोबस्तात सदर मिळकतीचा ताबा घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुधाकर मोगल नावाच्या व्यक्तीने कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, पंचवटी पोलिसांनी त्याला बाजूला सारत जप्तीची प्रक्रिया पूर्ण केली. बँकेने मालमत्ता सील करून तिथे सुरक्षेसाठी 'मे. यशवंत सिक्युरिटी सर्व्हीसेस'चे रक्षक तैनात केले होते.
महिलांचा वापर करून सील तोडले
बँकेची टीम आणि पोलीस निघून गेल्यानंतर, सायंकाळच्या सुमारास संशयित सुधाकर मोगल हा कर्जदार गुप्ता कुटुंबीयांसह पुन्हा त्या ठिकाणी दाखल झाला.
कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्यांनी घरातील महिलांना पुढे केले. या महिलांनी तिथे तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला धमकावून व धक्काबुक्की करून हुसकावून लावले. यानंतर संशयितांनी बँकेने कायदेशीर रित्या ठोकलेले सील तोडून मिळकतीवर पुन्हा बेकायदेशीर ताबा मिळवला.
पाच जणांवर गुन्हे दाखल
या उद्धट आणि बेकायदेशीर कृत्याबद्दल बँकेचे व्यवस्थापक गावडे यांच्या फिर्यादीवरून सुधाकर मोगल, रमाकांत गुप्ता, विकास गुप्ता, कोमल गुप्ता आणि कलावती गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी पोलीस हवालदार कोरडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.