नाशिकमध्ये खाकीचा धाक संपला? पायी जाणाऱ्या महिलेला कोयता दाखवला... धमकी देत निर्वस्त्र करण्याचा प्रयत्न...

Share:
Main Image
Last updated: 15-Jul-2026

नाशिक, (प्रतिनिधी) १५ जुलै - शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. दुचाकीवर ट्रिपलसीट आलेल्या तीन नराधमांनी एका ३८ वर्षीय महिलेचा पाठलाग करत तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नव्हे, तर भररस्त्यात महिलेचा मोबाईल हिसकावून तिला निर्वस्त्र करण्याचाही संतापजनक प्रयत्न केला. पीडित महिलेने प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्यामुळे तिचा जीव वाचला असून, आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला आहे. याप्रकरणी मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहाटेच्या सुमारास थरार

मिळालेल्या माहितीनुसार, खोडेनगर भागात राहणारी ३८ वर्षीय महिला रविवारी (दि. १२) रात्री वडाळानाका भागात राहणाऱ्या आपल्या आईच्या घरी गेली होती. दुसऱ्या दिवशी पहाटे पावणे पाच वाजेच्या सुमारास ती आपल्या घराच्या दिशेने पायी जात असताना हा थरारक प्रकार घडला.

साई प्रितम हॉटेल परिसरात महिलेला तिचे काका अकील शेख भेटले. त्यांच्याशी काही वेळ गप्पा मारून महिला पुढे निघाली. ती थोड्या अंतरावर पोहोचते न पोहोचते, तोच मागून 'MH 15 JP 5873' या क्रमांकाच्या दुचाकीवरून तीन जण ट्रिपलसीट आले आणि त्यांनी महिलेची वाट अडवली.

Advertisement

कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न

दुचाकीवरील त्रिकुटापैकी एकाने महिलेच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला, तर दुसऱ्याने तिचा हात पकडून तिला विवस्त्र करण्याचा लज्जास्पद प्रयत्न केला. या अचानक झालेल्या प्रसंगामुळे महिला प्रचंड घाबरली. तिने स्वतःची सुटका करून घेत तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, नराधमांनी "आज तेरे को खतम करूंगा" अशी जीवे मारण्याची धमकी देत, कोयता काढून तिच्यावर हल्ला करण्यासाठी तिचा पाठलाग सुरू केला.

महिलेचे प्रसंगावधान आणि आरोपींची पळापळ

अत्यंत बिकट परिस्थितीतही पीडित महिलेने धीर सोडला नाही. तिने मोठ्या मोठ्याने आरडाओरड करण्यास सुरुवात केली. महिलेचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक जागे होतील या भीतीने तिन्ही भामट्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली.

याप्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भररस्त्यात एका महिलेसोबत घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दाभाडे करत आहेत.

Advertisement

Comments

No comments yet.