'माविम'च्या एमडी यांचा नाशिक दौरा... या प्रकल्पांची पाहणी करून महिलांशी थेट संवाद....

Share:
Main Image
Last updated: 15-Jul-2026

एस.के. खेडकर, (नाशिक) १५ जुलै - "महिला आर्थिक विकास महामंडळाच्या (माविम) स्वयं-सहाय्यता गटांनी आता केवळ बचतीपुरते मर्यादित न राहता, बाजारपेठेची गरज ओळखून नाविन्यपूर्ण उद्योग-व्यवसाय उभारावेत. या माध्यमातून महिलांनी आपली आर्थिक प्रगती साधत खऱ्या अर्थाने स्वावलंबी व्हावे," असे प्रतिपादन 'माविम'च्या व्यवस्थापकीय संचालक राजलक्ष्मी शहा यांनी केले. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक शहा यांनी १३ व १४ जुलै रोजी नाशिक जिल्ह्याचा दोन दिवसीय सविस्तर दौरा केला, त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. या दौऱ्यात त्यांच्यासोबत कार्यक्रम व्यवस्थापक रूपा मेस्त्री, विभागीय सल्लागार शैलेश पाटील, विभागीय व्यवसाय विकास सल्लागार नवनाथ नाईक आणि जिल्हा समन्वय अधिकारी उल्हास पाटील उपस्थित होते.

'सह्याद्री फार्म'ला भेट व योजनांचा आढावा

दौऱ्याच्या पहिल्या दिवशी शहा यांनी प्रगतीशील 'सह्याद्री फार्म'ला भेट देऊन तेथील विविध आधुनिक उपक्रमांची पाहणी केली. यावेळी सह्याद्री फार्मचे व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे यांनी त्यांच्या संस्थेच्या कार्यपद्धतीची माहिती दिली. त्यानंतर झालेल्या बैठकीत त्यांनी नाशिक जिल्ह्यातील 'सीएमआरसी' (CMRC) व्यवस्थापकांकडून सुरू असलेल्या विविध शासकीय योजनांचा कसून आढावा घेतला व महिला सक्षमीकरणासाठी अधिक परिणामकारक उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या.

आंबेवणी गावात महिलांशी संवाद

Advertisement

दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी दिंडोरी तालुक्यातील आंबेवणी गावाला भेट देऊन थेट बचत गटातील महिला, विविध उपप्रकल्पांचे लाभार्थी, 'तेजश्री कर्ज योजने'अंतर्गत स्वतःचा व्यवसाय सुरू केलेल्या महिला आणि माविम मित्र मंडळाच्या सदस्यांशी संवाद साधला. यावेळी महिलांनी बचत गटांमुळे त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभव सांगितले.

व्यवसाय विस्तारासाठी 'माविम'चे पूर्ण पाठबळ!

आंबेवणी येथे महिलांनी सुरू केलेल्या शेती अवजार बँक, मसाला कांडप यंत्र प्रकल्प आणि बटाटा वेफर्स उपक्रमाची राजलक्ष्मी शहा यांनी कौतुकाने पाहणी केली. महिलांना उद्योग विस्तारासाठी आवश्यक असणारे भांडवल, तांत्रिक प्रशिक्षण आणि संस्थात्मक पाठबळ उपलब्ध करून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ कायम तत्पर राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी महिलांना उद्योगांची योग्य निवड करणे, व्यवसायातील अडचणींवर मात करणे आणि सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून उपलब्ध असणाऱ्या नव्या संधींविषयी राजलक्ष्मी शहा व कार्यक्रम व्यवस्थापक रूपा मेस्त्री यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

Advertisement

Comments

No comments yet.