MP5 रायफल, सरकारी इनोव्हा आणि बनावट ओळखपत्रे... लुटारू टोळी जेरबंद... नाशिक पोलिसांची मोठी कारवाई...

Share:
Main Image
Last updated: 14-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १४ जुलै - बनावट ओळखपत्रांच्या आधारे स्वतःला शासकीय अधिकारी भासवून आणि सरकारी दिव्याच्या गाडीचा वापर करून भरदिवसा ७० लाख रुपयांची थरारक लूट करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट-१ ने पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका महिलेसह चार जणांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून तब्बल ८२ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार, शस्त्रे आणि विविध सरकारी विभागांचे बनावट रबरी शिक्के व ओळखपत्रांचा समावेश आहे.

५ कोटींच्या गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि थरार
दिनांक ८ जुलै २०२६ रोजी पंचवटी परिसरातील दिंडोरी रोडवर एका व्यक्तीला दोन अनोळखी पुरुष आणि एका महिलेने गाठले. स्वतः पोलीस असल्याचे सांगत त्यांनी सरकारी दिव्याच्या इनोव्हा गाडीत फिर्यादीला बंदुकीचा धाक दाखवून बळजबरीने बसवले. गाडीत फिर्यादीला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आणि त्याच्या पिशवीतील ७० लाख रुपयांची रोख रक्कम व मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतला. त्यानंतर आरोपींनी फिर्यादीला थेट मुंबई-पुणे हायवेवर सोडून पोबारा केला होता. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Advertisement

गुन्हे शाखेची सात विशेष पथके आणि वेशांतर
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) किरणकुमार चव्हाण आणि सहा. पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांच्या नेतृत्वाखाली सात विशेष पथके तयार करण्यात आली.
तांत्रिक विश्लेषण, गुप्त माहिती आणि परिस्थीतीजन्य पुराव्यांच्या आधारे पथकाने तपास सुरू केला. मुख्य संशयित नाशिकरोड रेल्वे स्टेशनवर येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तिथे सापळा रचला. मात्र, आरोपी मुंबईच्या दिशेने पसार झाल्याचे समजताच पथकाने जोगेश्वरी, अंधेरी, डोंबिवली आणि वसई-विरार परिसरातून आरोपींचा माग काढत त्यांना अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेले आरोपी:
१) उमाशंकर प्रेमशंकर वर्मा (वय ४०), रा. रामनगर, आझमगड, उत्तर प्रदेश.
२) सुजितकुमार राजकिशोर दुबे (वय ३२), रा. धनबाद, झारखंड.
३) निलेश अशोक पका (वय २७), रा. नागेबंदर, वसई.
४) संगीता हंसराज अहिरे (वय ४३), रा. कोणार्क नगर, नाशिक (मूळ रा. जळगाव).

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि बनावट ओळखपत्रे:

पोलिसांनी आरोपींकडून एकूण ८२,१०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, ज्यामध्ये:

५५,१०,००० रुपये रोख रक्कम.

गुन्ह्यात वापरलेली शासकीय दिवा असलेली गोल्डन रंगाची इनोव्हा कार (MH 02 BP 9071).
एक रिव्हॉल्व्हर सदृश शस्त्र आणि एक MP5 रायफल सदृश अग्नीशस्त्र.
बनावट ओळखपत्रे: मुख्य आरोपी उमाशंकर वर्मा याच्या नावाचे आयकर विभाग (मुंबई) चे 'वरिष्ठ निरीक्षक' पदाचे, गृह मंत्रालयाचे 'चीफ ऑफिस सुपरिंटेंडेंट' पदाचे, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) चे 'सब-इन्स्पेक्टर', तसेच रेल्वे विभागाचे बनावट आयडी कार्ड्स, रेल्वे पासेस आणि विविध सरकारी विभागांचे बनावट रबरी शिक्के.

नागरिकांना पोलीस प्रशासनाचे आवाहन:

या टोळीने अशाच प्रकारे बनावट ओळखपत्रे आणि अधिकारांचा गैरवापर करून आणखी अनेकांना गंडा घातल्याची दाट शक्यता आहे. अशा प्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ गुन्हे शाखा युनिट-१, नाशिक शहर (फोन नं: ०२५३-३१४६१२) येथे संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही यशस्वी कामगिरी पोउनि चेतन श्रीवंत, दत्तात्रय पोटे, रमीज शेख, सुनील चव्हाण आणि गुन्हे शाखा युनिट-१ च्या सायबर, रेकी, गोपनीय माहिती व QRT सशस्त्र पथकातील अंमलदारांनी बजावली आहे.

Advertisement

Comments

No comments yet.