नाशिक, (प्रतिनिधी) १४ जुलै - सोशल मीडियावर हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन 'रील' (Reel) बनवणे आणि दहशत माजवणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले आहे. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच आडगाव पोलिसांनी अत्यंत तत्परतेने अवघ्या काही तासांत शोध घेत कोयता बाळगणाऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्या ताब्यातून गुन्हा करण्यासाठी वापरलेला लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला असून त्याच्यावर शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशिष भिकन गांगुर्डे (वय २४, रा. म्हाडा बिल्डिंग, पंचकृष्ण लॉन्सजवळ, कोणार्क नगर, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्या संशयित तरुणाचे नाव आहे.
असा लागला व्हिडिओचा सुगावा
संशयित आशिष गांगुर्डे याने हातामध्ये धारदार कोयता बाळगून, परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने एक रील तयार केली आणि ती सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अपलोड केली होती. हा व्हिडिओ आडगाव पोलिसांच्या सायबर आणि स्थानिक तपास पथकाच्या निदर्शनास आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तात्काळ तपासाचे आदेश दिले.
गोठ्याजवळ रचला सापळा
पोलिसांनी व्हिडिओच्या पार्श्वभूमीची (Background) बारकाईने चाचपणी केली. त्यावरून हा व्हिडिओ बिडी कामगार नगर ते निलगिरी मार्गावरील पाटाजवळ चित्रित करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी आपल्या गुप्तहेरांचे (खबरे) जाळे सतर्क केले. रात्री दहा वाजेच्या सुमारास संशयित आशिष हा याच परिसरातील एका गोठ्याजवळ लपून बसल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पथकाने तातडीने तिथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे धारदार लोखंडी कोयता मिळून आला.
या पथकाने केली कारवाई
ही धडक कारवाई आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रविण चव्हाण, पोलीस निरीक्षक दिलीप राठोड व गौतम वाबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
कारवाईतील पोलीस पथक:
सहाय्यक पोलीस निरीक्षक निखील बोंडे, सतिश जगदाळे, पोलीस उपनिरीक्षक योगीता पाटील, पोलीस हवालदार दादासाहेब वाघ, इम्रान शेख, निलेश काटकर, शिवाजी आव्हाड, मनोज परदेशी, सुमित शिंदे, शक्ती पेंढारकर, मनोज मोरे, अक्षय गोसावी, रविंद्र लिलके, प्रितम बोराटे, कुणाल राऊत, दिपक भुजबळ आणि वैशाली बच्छाव यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली. सोशल मीडियावर अशा प्रकारे शस्त्रांचे प्रदर्शन करून भाईगिरी करणाऱ्यांवर यापुढेही कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.