ताहाराबाद, (प्रतिनिधी)) १३ जुलै - एसटी बसमध्ये चढत असताना प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन चोरट्यांनी एका महिलेच्या हातावर रुमाल टाकून अडीच तोळे वजनाची सोन्याची बांगडी हातोहात लांबवल्याची धक्कादायक घटना ताहराबाद (ता. सटाणा) येथील बसस्थानक परिसरात घडली आहे. या चोरीच्या घटनेत महिलेचे सुमारे ७५ हजार रुपये किमतीचे नुकसान झाले असून, याप्रकरणी जायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
'हात की सफाई' करत सोन्याची बांगडी कापली
याप्रकरणी लता देवीदास येवले (वय ५४, रा. पिंपळनेर, ता. साक्री) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लता येवले या ताहराबाद येथे आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. गेल्या रविवारी (दि. ५) त्या परतीच्या प्रवासासाठी ताहराबाद बसस्थानकावर आल्या. नाशिक-नंदुरबार या बसमध्ये चढत असताना प्रवाशांची मोठी गर्दी होती.
या गर्दीत बसच्या दरवाजातील लोखंडी दांड्याला (रॉड) पकडून त्या पायऱ्या चढण्याचा प्रयत्न करत होत्या. नेमकी याच संधीचा फायदा चोरट्यांनी घेतला. भामट्यांनी अत्यंत हुशारीने त्यांच्या हातावर रुमाल टाकला आणि त्यांच्या हातातील अडीच तोळे वजनाची सोन्याची बांगडी कापून नेली. बसमध्ये चढून स्थिर झाल्यानंतर लता यांच्या लक्षात हा प्रकार आला.
जायखेडा पोलिसात गुन्हा दाखल
आपली सोन्याची बांगडी चोरीला गेल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी तातडीने जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार शेरे करत आहेत.
प्रवाशांना आवाहन: बसस्थानक किंवा सार्वजनिक ठिकाणी प्रवास करताना महिलांनी आपल्या दागिन्यांबाबत सतर्क राहावे. विशेषतः बसमध्ये चढताना-उतरताना गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या अशा चोऱ्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.