उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या आरोग्यसेवेचे नवे पर्व... लोकसभा अध्यक्षांच्या हस्ते अत्याधुनिक अशोक हॉस्पिटलचे लोकार्पण...

Share:
Main Image
Last updated: 12-Jul-2026

मनोहर शिंदे, (नाशिक) १२ जुलै - "केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे आरोग्य जपण्यासाठी विविध योजना राबविल्या जात असतानाच, खाजगी क्षेत्रही यात मोठी भूमिका बजावत आहे. अशोका ग्रुपच्या माध्यमातून नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात जागतिक दर्जाच्या, आधुनिक आणि सर्वसमावेशक आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात होत आहे," असे कौतुकोद्गार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी काढले. नाशिकमधील अत्याधुनिक 'अशोका हेल्थ सिटी' आणि अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी (दि. १२) लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले, त्याप्रसंगी ते बोलत होते. या सोहळ्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, राजस्थानचे ऊर्जा राज्यमंत्री हिरालाल नागर, खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छाव, अशोका ग्रुपचे चेअरमन अशोक कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, अशोका इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चचे संचालक डॉ. सुशील पारख व अंकिता पारख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

आरोग्य क्षेत्रात नाशिकची नवी ओळख

उपस्थितांना संबोधित करताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, "नाशिक हे धार्मिक आणि आध्यात्मिक शहर म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या या पवित्र भूमीला आता वैद्यकीय क्षेत्रातील या नव्या वाटचालीमुळे एक आधुनिक ओळख मिळाली आहे. अशोका हेल्थ सिटी ही अत्याधुनिक उपचार, वैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि रुग्णकेंद्रित सेवा यांचा त्रिवेणी संगम असलेली एकात्मिक आरोग्यनगरी आहे. येथील आरोग्यसेवा प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल."

उपचारासोबतच संशोधनाचे केंद्र बनावे!

कोरोना काळातील महाराष्ट्राच्या लस संशोधनाचा दाखला देत श्री. बिर्ला पुढे म्हणाले, "आरोग्य क्षेत्रात नवे तंत्रज्ञान आणि संशोधनाची मोठी गरज आहे. अशोका हेल्थ सिटी हे केवळ उपचाराचे केंद्र न राहता संशोधनाचे मोठे क्षेत्र बनावे. या माध्यमातून सर्वसामान्यांना किफायतशीर आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला."

Advertisement

समाजाप्रती बांधिलकी: अशोक कटारिया

अशोका ग्रूपचे प्रमुख अशोक कटारिया यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, "गेल्या २५ वर्षांपासून पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या अशोका ग्रुपसाठी नाशिक ही कर्मभूमी आहे. समाजाप्रती असलेल्या बांधिलकीतूनच आम्ही शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात पाऊल ठेवले असून, सर्वोत्तम सेवा देण्याचा आमचा मानस आहे."

एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या सुविधा

'अशोका हेल्थ सिटी'च्या भव्य परिसरात उत्तर महाराष्ट्रातील पहिले थीम-आधारित 'अशोका वुमेन अँड चिल्ड्रेन हॉस्पिटल', 'अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल', 'अशोका कॅन्सर सेंटर ऑफ अमेरिका' आणि लवकरच सुरू होणारे 'अशोका कॉलेज ऑफ नर्सिंग एक्सलन्स' यांसारख्या महत्त्वाच्या संस्था एकाच परिसरात कार्यरत राहणार आहेत.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांचा प्रभू श्रीराम यांची मूर्ती देऊन विशेष सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, सल्लागार तसेच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संचालक अंकिता पारख यांनी केले.

?s=20

Advertisement

Comments

No comments yet.